esakal | हॅपीएस्ट माइंड टेक्‍नॉलॉजीजचा  "आयपीओ' कसा आहे? 
sakal

बोलून बातमी शोधा

ipo

‘आंत्रप्रेन्युअरशीप सिम्पलीफाइड फ्रॉम आयडिया टू आयपीओ’ या बेस्टसेलर पुस्तकाचे लेखक, कंपनीचे प्रवर्तक व अध्यक्ष अशोक सुता हे आयटी क्षेत्रामधील नावाजलेले व्यक्तिमत्व आहे.

हॅपीएस्ट माइंड टेक्‍नॉलॉजीजचा  "आयपीओ' कसा आहे? 

sakal_logo
By
नंदिनी वैद्य

प्रश्‍न - हॅपीएस्ट माइंड टेक्‍नॉलॉजीजच्या ‘आयपीओ’बद्दलची प्राथमिक माहिती काय आहे? 
- ‘हॅपीएस्ट पीपल हॅपीएस्ट कस्टमर’ हे मिशन आणि वेल्थ क्रीएशन अँड शेअरिंग ही फिलोसॉफी असणाऱ्या हॅपीएस्ट माइंड टेक्‍नॉलॉजीज्‌ लि. या कंपनीची प्राथमिक समभागविक्री (आयपीओ) ७ ते ९ सप्टेंबर दरम्यान होत आहे. हा इश्‍यू ७०२ कोटी रुपयांचा असून, त्यासाठीचा किंमतपट्टा रु. १६५-१६६ प्रतिशेअर आहे. यासाठी किमान ९० व नंतर ९० शेअरच्या पटीत मागणी करता येणार आहे. छोटे (रिटेल) गुंतवणूकदार कमीत कमी ९० तर जास्तीत जास्त ११७० शेअरसाठी अर्ज करू शकतील.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रश्‍न - कंपनीची प्राथमिक माहिती व व्यवसायाचे स्वरूप कसे आहे?
- ही बंगळूरस्थित आयटी क्षेत्रातील कंपनी असून, डिजिटल बिझनेस, प्रॉडक्‍ट इंजिनिअरिंग व इन्फ्रा मॅनेजमेंट सोल्युशन यामध्ये त्यांचे कामकाज चालते. ९७ टक्के व्यवसाय हा डिजिटल बिझनेस आहे. देशातील अशा इतर कंपन्या ३०-५० टक्केच डिजिटल बिझनेसमध्ये आहेत. सध्या कोव्हीडच्या काळात डिजिटल व्यवसायाची व्याप्ती खूपच वाढली आहे आणि पुढेही वाढणार आहे. त्यामुळे या कसोटीच्या काळातदेखील कंपनीच्या ७६ टक्के व्यवसायावर काहीही परिणाम झाला नाही. या कंपनीचे सुमारे १५७ सक्रीय ग्राहक आहेत. लवचिकता आणि कामातील तत्परता हा कामाचा मूलमंत्र असल्यामुळे असलेले ग्राहक दीर्घकाळ टिकवून ठेवण्यात कंपनीला यश आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रश्‍न - कंपनीच्या व्यवस्थापनाबद्दल काय माहिती सांगता येईल?
- ‘आंत्रप्रेन्युअरशीप सिम्पलीफाइड फ्रॉम आयडिया टू आयपीओ’ या बेस्टसेलर पुस्तकाचे लेखक, कंपनीचे प्रवर्तक व अध्यक्ष अशोक सुता हे आयटी क्षेत्रामधील नावाजलेले व्यक्तिमत्व आहे. विप्रो आणि माइंडट्री या कंपन्यांना एका उंचीवर नेऊन त्यांनी नव्याने प्रवर्तित केलेली ही कंपनी नावारूपाला आणली आणि आता त्याचा ‘आयपीओ’ ते आणत आहेत.

प्रश्‍न - कंपनीची आर्थिक कामगिरी कशी आहे?
- मागील तीन वर्षांतील कंपनीची आर्थिक कामगिरी उल्लेखनीय असून, गेल्या तीन वर्षांत उत्पन्न ४८९ कोटी रुपयांपासून ७१४ कोटींपर्यंत २२ टक्के ‘सीएजीआर’ने वाढले, तर नफा २०१८ मध्ये (२२ कोटी) तोट्यापासून २०२० मध्ये ७१ कोटी रुपयांच्या फायद्यापर्यंत पोचले. जून २०२० मध्ये संपलेल्या तिमाहीमध्ये उत्पन्न १८६ कोटी रुपये, तर नफा ५० कोटी रुपये इतका होता.
 
प्रश्‍न - आगामी काळात व्यवसायासाठी असलेले धोके काय आहेत?
- अमेरिकेवर ७० टक्के अवलंबून असलेला व्यवसाय (जो ते इतर देशांमध्ये विस्तारित आहेत), आयटी व्यवसायामध्ये असणारा कर्मचाऱ्यांचा नोकरी सोडण्याचा दर (ॲट्रिशन रेट), ग्राहकांची असणारी मर्यादित संख्या आणि त्यांच्याबरोबर असणारे मर्यादित काळासाठीचे करार, अत्यंत वेगाने घडणारे आयटी क्षेत्रातील बदल व त्यांच्याशी कंपनी कशा पद्धतीने जुळवून घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

प्रश्‍न - छोट्या गुंतवणूकदारांसाठी हा ‘आयपीओ’ कसा आहे?
- प्रतिशेअर रु. १६६ इतकी इश्‍यु किंमत गृहीत धरली तर आर्थिक वर्ष २०२० नुसार पीई रेशो ३१ येतो. सेकंडरी बाजारात असलेल्या बाकीच्या कंपन्यांचा पीई रेशो २६-२७ च्या दरम्यान आहे. खरे तर कंपनीच्या व्यवसायाशी योग्यप्रकारे तुलना होईल, अशी कोणतीच कंपनी आता बाजारात नाही. तसेच ‘ग्रोथ स्टॉक’ म्हणून या कंपनीची गणना होऊ शकेल. त्यामुळे युनिक बिझनेस मॉडेल, उत्तम आर्थिक कामगिरी आणि मजबूत व्यवस्थापन या सर्वांचा विचार करता नोंदणीच्या वेळी उत्तम परताव्यासाठी व दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूकदारांनी अर्ज करायला काहीच हरकत नाही.
  
(डिस्क्‍लेमर - लेखिका ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहे. शेअर बाजारातील जोखीम लक्षात घेऊन वाचकांनी गुंतवणुकीबाबतचे निर्णय स्वत-च्या जबाबदारीवर व तज्ज्ञ सल्लागाराच्या मदतीने घेणे अपेक्षित आहे.)

loading image
go to top