"निफ्टी' कुठवर जाणार? 

राजेंद्र सूर्यवंशी 
सोमवार, 18 जून 2018

शेअर बाजाराच्या वाढीसाठी सध्या पोषक वातावरण दिसत नाही; परंतु मोठ्या घसरणीसाठीही बाजार तयार नाही. थोडी घसरण होताच बाजार पुन्हा खरेदीच्या जोरावर पूर्ववत पातळीवर येत आहे. बाजारात मोठी वाढ होईल, अशी परिस्थिती नाही. जागतिक पातळीवर पुन्हा व्यापारयुद्ध सुरू होण्याचे संकेत मिळत असून, यात भारतही खेचला जाण्याची शक्‍यता समोर येत आहे. अमेरिकी फेडरल रिझर्व्हने पुन्हा पाव टक्‍क्‍याने व्याजदरवाढ केली असून, पुढील काळात अजून दोनदा अशीच वाढ करण्याचे संकेत दिले गेले आहेत. व्याजदरवाढीचे सुरू झालेले हे चक्र जागतिक पातळीवर शेअर बाजाराची घडी बिघडवणार, यात शंका नाही.

शेअर बाजाराच्या वाढीसाठी सध्या पोषक वातावरण दिसत नाही; परंतु मोठ्या घसरणीसाठीही बाजार तयार नाही. थोडी घसरण होताच बाजार पुन्हा खरेदीच्या जोरावर पूर्ववत पातळीवर येत आहे. बाजारात मोठी वाढ होईल, अशी परिस्थिती नाही. जागतिक पातळीवर पुन्हा व्यापारयुद्ध सुरू होण्याचे संकेत मिळत असून, यात भारतही खेचला जाण्याची शक्‍यता समोर येत आहे. अमेरिकी फेडरल रिझर्व्हने पुन्हा पाव टक्‍क्‍याने व्याजदरवाढ केली असून, पुढील काळात अजून दोनदा अशीच वाढ करण्याचे संकेत दिले गेले आहेत. व्याजदरवाढीचे सुरू झालेले हे चक्र जागतिक पातळीवर शेअर बाजाराची घडी बिघडवणार, यात शंका नाही. यामुळे परकी गुंतवणूकदार सातत्याने बाजारातून पैसे काढत आहेत. त्या तुलनेत देशी वित्तीय संस्थांनी मोठी खरेदी केली आहे. यामुळे आपला बाजार एका पातळीत स्थिरावला आहे. 

पुढील काळात गुंतवणुकीसाठी माहिती तंत्रज्ञान, फार्मा, बॅंकेतर कर्ज वितरण करणाऱ्या संस्था व वाहन क्षेत्रातील कंपन्यांत गुंतवणुकीस वाव राहील. पेट्रोल व डिझेलचे भाव वाढत असल्याने व याचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याने सरकारी पातळीवरून याला पर्याय म्हणून इलेक्‍ट्रिकल वाहननिर्मितीवर भर दिला जात आहे. या क्षेत्रातही गुंतवणुकीस वाव राहील. 

जागतिक शेअर बाजार संमिश्र असून, मोठ्या चढ-उताराची भीती लगेच नाही. अशा परिस्थितीत आपला निफ्टी 10,950 अंशांपर्यंत जाऊ शकेल; परंतु त्यापुढे "निफ्टी' जाण्याची शक्‍यता नसून तेथून पुन्हा बाजारात घसरण होण्याची शक्‍यता राहील. 
तांत्रिक कल कसा राहील? 

मागील शुक्रवारी "निफ्टी' 10,814 अंशांवर बंद झाला असून, या आठवड्यासाठी 10,700 व 10,950 अंश या पातळ्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. 10,850 अंशांवर "निफ्टी' एक दिवस टिकला तर पुढे 10,950 अंशांपर्यंत जाण्याची शक्‍यता राहील; परंतु खालच्या बाजूला 10,700 अंश ही पातळी तोडून घसरण्याची शक्‍यता कमी आहे. या आठवड्यात "निफ्टी'त वाढ होईल, असे संकेत असून, 10,950 अंशांपर्यंत जाण्याची शक्‍यता आहे. 10,950 अंशांपुढे वाढीस पोषक वातावरण नसल्याने, तेथून पुन्हा "निफ्टी'त घसरण होण्याची शक्‍यता आहे. 

(लेखक शेअर बाजाराचे संशोधक-अभ्यासक आहेत. त्यांनी त्यांच्या अभ्यासातून वरील अंदाज वर्तविले आहेत. शेअर बाजारातील जोखीम लक्षात घेऊन वाचकांनी गुंतवणुकीबाबतचे निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घेणे अपेक्षित आहे.) 

 

Web Title: "Nifty" Where to go?