"निफ्टी' किती वाढेल?

राजेंद्र सूर्यवंशी
Monday, 29 April 2019

लोकसभा निवडणुकीच्या वातावरणाचा पारा मध्यावर आला असून, शेअर बाजार त्याबाबत अंदाज घेत वाढत आहे.

पुणे: लोकसभा निवडणुकीच्या वातावरणाचा पारा मध्यावर आला असून, शेअर बाजार त्याबाबत अंदाज घेत वाढत आहे. यंदाची ही सार्वत्रिक निवडणूक बाजारासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या निवडणुकीतून "अपेक्षित निकाल' समोर येतील, असे बाजार गृहीत धरून आहे. या अनुषंगाने मागील काही दिवसांपासून "निफ्टी' 12,000 अंशांपर्यंत वाढेल, असे संकेत होते आणि हे लक्ष्य निवडणुकीचा निकाल लागण्याअगोदरच गाठले जाईल, असे वाटत होते. परंतु, 12,000 अंशांच्या पुढे "निफ्टी' निर्देशांकात वाढ होऊ शकणार नाही, असे संकेत दिसू लागले आहेत. परकी वित्तीय संस्थांनी डिसेंबरनंतर खरेदीस सुरवात केल्यानंतर जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत वाढती गुंतवणूक केली होती. परंतु, या महिन्यात (12635 कोटी) मागील महिन्याच्या (32371 कोटी) तुलनेत कमी झाली आहे. देशी वित्तीय संस्था तर मागील तीन महिन्यांपासून नफावसुली करीत आहेत. पुढे नफावसुलीत वाढ होण्याचे संकेत असून, "निफ्टी'चा पी/ई (29.34), पीसीआर (1.56), चढ-उतारांचा निर्देशांक (21.45), तांत्रिक आलेख व "निफ्टी'च्या वायदा बाजारातील घटत असलेला प्रीमिअम भाव (मागील महिन्याच्या तुलनेत) ही सर्व परिमाणे बाजाराची पुढील वाढ थांबणार असल्याचे संकेत देत आहेत. मार्च तिमाहीचे सर्वांत मोठ्या 27 कंपन्यांचे निकाल जाहीर झाले असून, त्यापैकी 18 कंपन्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. त्या अनुषंगाने बाजारावर दबाव नाही. परंतु, इतर कंपन्यांचे पुढे येणारे निकाल बाजारात खरेदीचा जोर वाढवतील, असे दिसत नाही. 

"निफ्टी'ची चाल कशी असेल? 
मागील शुक्रवारी "निफ्टी' 11,750 अंशांवर बंद झाला असून, या आठवड्यासाठी 11,800 व 11,665 अंश या पातळ्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पुन्हा जर खालच्या दिशेने "निफ्टी'ने 11,665 अंशांची पातळी तोडली, तर पुढे 11,500 अंशांपर्यंत घसरण होण्याची शक्‍यता अधिक असेल. 11,800 अंशांच्या वर "निफ्टी' एक दिवस टिकला तर पुढे 12,000 अंशांपर्यंत जाण्याची शक्‍यता राहील. सर्वांगीण व सर्व परिमाणांचा विचार करता, सध्या "निफ्टी' हळूहळू 12,000 अंशांपर्यंत वाढण्याची शक्‍यता दिसत आहे. परंतु, 12,000 अंशांपुढे लगेच वाढण्याचे संकेत सध्या दिसत नाहीत. 12,000 अंशांपासून बाजार पुन्हा घसरण्याची शक्‍यता आहे. 

(डिस्क्‍लेमर ः लेखक शेअर बाजाराचे संशोधक-विश्‍लेषक आहेत. त्यांनी त्यांच्या अभ्यासातून वरील अंदाज व्यक्त केले आहेत. त्यांच्याशी "सकाळ' सहमत असेलच असे नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nifty: Will Nifty cross the 12,000