घसरत्या व्याजदरांत चांगला परतावा मिळवा 

निमेश शाह
सोमवार, 26 डिसेंबर 2016

सातत्याने घसरणाऱ्या व्याजदरांनी सामान्य गुंतवणूकदारांची चिंता वाढवली आहे. मुदत ठेवी आणि इतर पारंपरिक योजनांत वर्षानुवर्षे गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार आता पैसे नेमके कुठे गुंतवायचे, या विचारात सापडले आहेत. इक्विटी, म्युच्युअल फंड, अल्पबचत, हायब्रिड फंडस्‌, फिक्‍स्ड इन्कम किंवा इतर काही पर्यायांत पैसे गुंतवणे योग्य आहे का, असा प्रश्‍न प्रत्येक गुंतवणूकदाराला सतावत आहे. इक्विटी इन्कम फंड योजना यासाठी चांगला पर्याय ठरू शकते. 
 

सातत्याने घसरणाऱ्या व्याजदरांनी सामान्य गुंतवणूकदारांची चिंता वाढवली आहे. मुदत ठेवी आणि इतर पारंपरिक योजनांत वर्षानुवर्षे गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार आता पैसे नेमके कुठे गुंतवायचे, या विचारात सापडले आहेत. इक्विटी, म्युच्युअल फंड, अल्पबचत, हायब्रिड फंडस्‌, फिक्‍स्ड इन्कम किंवा इतर काही पर्यायांत पैसे गुंतवणे योग्य आहे का, असा प्रश्‍न प्रत्येक गुंतवणूकदाराला सतावत आहे. इक्विटी इन्कम फंड योजना यासाठी चांगला पर्याय ठरू शकते. 
 

काही महिन्यांतील आर्थिक घडामोडी आणि वित्तीय बाजाराची स्थिती लक्षात घेतली, तर मुदत ठेवी आणि अल्पबचतीला परतावा कमी होत आहे. त्या तुलनेत डेट म्युच्युअल फंडांनी चांगली कामगिरी करत अल्प कालावधीत चांगला परतावा दिला आहे. याच कालावधीत इक्विटीनेही आकर्षक परतावा दिला. बाजारातील अनिश्‍चितताही यावर परिणाम करते. करबचतीच्या दृष्टीने विचार केल्यास या दोन्ही गुंतवणूक योजनांतून फारसा फायदा मिळत नाही. करबचतीचा लाभ मिळण्याबरोबर चांगला परतावा देणारा म्हणून आयसीआयसीआय प्रुडेन्शियल इक्विटी इन्कम फंड आजच्या घडीला चांगला पर्याय ठरू शकतो. डेटवाला इक्विटी फंड, अशी ओळख असलेल्या या फंडातून गुंतवणूकदाराला इक्विटीवरील करबचत व डेटमधील स्थिर गुंतवणुकीचा फायदा मिळतो. 

पाच वर्षांत व्याजदर उच्च पातळीवर असल्याने निश्‍चित परतावा देणाऱ्या योजनांतून गुंतवणूकदारांना चांगले उत्पन्न मिळाले. आता अल्पबचतीचे व्याजदर बाजाराशी संलग्न करण्यात आले आहेत. दीर्घ कालावधीत व्याजदर खाली राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पारंपरिक गुंतवणूक योजनांतून परतावाही कमीच मिळेल. याशिवाय डेट म्युच्युअल फंडांच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. दोन वर्षांपासून रोखे परताव्यात (बॉण्ड यिल्ड) मोठी घसरण झाली. परिणामी डेट म्युच्युअल फंडांची कामगिरी बहरली. फिक्‍स्ड इन्कम योजनांच्या तुलनेत डेट फंडांची घोडदौड सुरूच आहे. त्याचबरोबर इक्विटीतही चांगला परतावा देण्याची क्षमता आहे. इक्विटीतील किमतींनी नुकताच तळ गाठला आहे. नव्याने गुंतवणूक करणाऱ्यांसाठी योग्य संधी मिळाली आहे. नजीकच्या काळात शेअर बाजारातील अनिश्‍चितता लक्षात घेता, गुंतवणूकदारांनी इक्विटीत गुंतवणूक करण्यासाठी नियोजनबद्ध मालमत्ता विभाजनाचा (असेट ऍलोकेशन) अवलंब करणे आवश्‍यक आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल इक्विटी इन्कम फंडातील गुंतवणूक ही मुख्यत्वे डेट योजनांतील गुंतवणूक आहे. आवश्‍यकता भासल्यास इक्विटीतही नियोजनबद्ध गुंतवणुकीचा पर्याय देते. 

डेट फंड आणि इक्विटी यातील गुंतवणुकीतून रोख्यांपेक्षाही जादा परतावा देण्याचा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. डेट आणि इक्विटी असे दोन्ही पर्यायांचे मिश्रण असलेली ही फंड योजना कर कार्यक्षमही आहे. यातून गुंतवणूकदाराला चांगला परतावा मिळतोच; शिवाय कर सवलतीचाही लाभ घेता येतो. म्हणूनच या योजनेला डेटवाला इक्विटी फंड, असे म्हणतात. डेट आणि इक्विटीतील गुंतवणुकीचे लाभ यातून मिळतात. इक्विटी फंड योजनेसाठी असलेल्या कर सवलती या योजनेलाही लागू होतात. त्याशिवाय डेट योजनेऐवजी इक्विटी योजनेचा स्वीकार करताना कोणतेही शुल्क द्यावे 
(एक्‍झिट लोड) लागत नाही. गुंतवणूक काढून घेण्यासाठी केवळ टी+1 इतका कालावधी लागतो. त्याशिवाय दरमहा लाभांश, पैसे काढण्यासाठी ऑटोमॅटिक रूटचा पर्याय व किमान शुल्क असे अनेक फायदा डेटवाला इक्विटी फंडांतून मिळतात. 

(लेखक हे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nimesh Shah writes about Mutual Fund investments