नीरव मोदीच्या 148 कोटींच्या मालमत्तांवर टाच 

वृत्तसंस्था
Wednesday, 27 February 2019

समभाग, म्युच्युअल फंड गोठवले 
ईडीने गेल्या वर्षी नीरव मोदी कंपनीच्या खात्यातील 30 कोटी रुपये व साडेसात कोटींचे समभाग गोठवले होते आणि मोठ्या प्रमाणात परदेशी बनावटीची महागडी घड्याळेही ताब्यात घेतली होती. या प्रकरणात त्याच्याकडील 94 कोटी 52 लाखांचे म्युच्युअल फंड व समभाग गोठवण्यात आले होते. 

मुंबई - पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी नीरव मोदी याच्या सुमारे 148 कोटींच्या मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) टाच आणली आहे. या सर्व मालमत्ता मुंबई आणि सुरत येथील आहेत. 

पीएनबीमधील साडेतेरा हजार कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी ईडीने नीरव मोदी याच्या 147 कोटी 72 लाख रुपयांच्या चल आणि अचल मालत्तांवर टाच आणली आहे. त्यामध्ये आठ कार, सुरतमधील प्लांट आणि यंत्रसामग्री, दागिने, महागडी चित्रे यांचा समावेश आहे. या सर्व मालमत्ता त्याच्या मालकीच्या असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले. 

पीएनबीला लेटर ऑफ अंडरटेकिंग (हमीपत्र) देऊन करण्यात आलेल्या साडेतेरा हजार कोटींच्या फसवणूकप्रकरणी सीबीआयने (केंद्रीय अन्वेषण विभाग) दोन गुन्हे दाखल केले होते. त्यातील पहिला गुन्हा 29 जानेवारीला दाखल करण्यात आला होता. त्यात नीरव मोदी व इतर आरोपींनी 280 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. 

ही फसवणूक तब्बल सहा हजार कोटींची असल्याचे सीबीआयच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. सीबीआयने मेहुल चोक्‍सी व इतर आरोपींवर चार हजार 886 कोटींचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणी ईडीनेही मनी लॉंडरिंगचे गुन्हे दाखल करून मोदीच्या मालमत्तांवर टाच आणली होती. 

ईडीने आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी नीरव मोदी याच्याशी संबंधित नऊ आलिशान गाड्या गुरुवारी जप्त केल्या होत्या. या आलिशान गाड्यांमध्ये रोल्स रॉईस घोस्ट, मर्सिडीज बेंझ, पोर्श पनामेरा, तीन होंडा कार, टोयोटा फॉर्च्युनर आणि इनोव्हा यांचा समावेश आहे. 

समभाग, म्युच्युअल फंड गोठवले 
ईडीने गेल्या वर्षी नीरव मोदी कंपनीच्या खात्यातील 30 कोटी रुपये व साडेसात कोटींचे समभाग गोठवले होते आणि मोठ्या प्रमाणात परदेशी बनावटीची महागडी घड्याळेही ताब्यात घेतली होती. या प्रकरणात त्याच्याकडील 94 कोटी 52 लाखांचे म्युच्युअल फंड व समभाग गोठवण्यात आले होते. 

'सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nirav Modi assets worth 148 crores