
लॉकडाउनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या स्पाईसजेट या प्रवासी विमान कंपनीने एप्रिल आणि मे महिन्यात वैमानिकांना वेतन दिले जाणार नसल्याचे म्हटले आहे.
नवी दिल्ली - लॉकडाउनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या स्पाईसजेट या प्रवासी विमान कंपनीने एप्रिल आणि मे महिन्यात वैमानिकांना वेतन दिले जाणार नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, लॉकडाउन काळात मालवाहतूक करणाऱ्या वैमानिकांना कामावर हजर असलेल्या दिवसांचेच वेतन मिळणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
लॉकडाउनमुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याचा फटका अनेक उद्योग क्षेत्रांना बसत आहे. हवाई वाहतूक क्षेत्रही त्याला अपवाद नाही. परिणामी आर्थिक घडी बसविण्यासाठी आणि कामकाज पूर्ववत सुरू करण्यासाठी कंपनी वेगवेगळ्या उपाययोजना करीत आहेत. त्याचाच भाग म्हणून एप्रिल आणि मे महिन्यात वैमानिकांना वेतन दिले जाणार नसल्याचे स्पाईसजेटने म्हटले आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
देशात लॉकडाउन जाहीर झाल्यापासून विमान कंपन्याचा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून येत्या काही आठवड्यात मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक करण्यासाठी कमीत कमी 50 टक्के विमाने कार्यरत होतील, अशा पद्धतीने उड्डाणांचे नियोजन करण्यात येत आहे. सर्व वैमानिकांना कामाची संधी मिळेल, यासाठी कंपनी प्रयत्न करीत असल्याचे कंपनीचे उड्डाण संचालन प्रमुख गुरचरण अरोरा यांनी म्हटले आहे. सद्यस्थितीत 16 टक्के विमाने आणि 20 टक्के वैमानिक कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले. यामध्ये मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमानांचा समावेश आहे. कंपनींकडे एकूण 116 प्रवासी वाहतूक तर 5 मालवाहतूक करणारी विमाने आहेत.
कंपन्यांकडून प्रवाशांना पैसे परत
दरम्यान, 3 मेनंतर लॉकडाउन संपेल या अपेक्षेने अनेक विमान कंपन्यांनी एप्रिलमध्ये बुकिंग सुरु केले होते. मात्र, सरकारच्या आदेशानंतर त्यांनी बुकिंग बंद करून प्रवाशांचे पैसे परत केले आहेत.