‘NPS’ मधील महत्त्वाचे बदल‘एनपीएस’मधील महत्त्वाचे बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NPS

‘NPS’ मधील महत्त्वाचे बदल‘एनपीएस’मधील महत्त्वाचे बदल

केंद्र सरकारने वर्ष २००४ पासून सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्ती नियोजन करता यावे म्हणून ‘एनपीएस’ अर्थात ‘नॅशनल पेन्शन सिस्टीम’ दाखल केली व पाच वर्षानंतर ती सर्वांसाठी खुली केली. मे २०२२ पर्यंत ५.३१ कोटी लोकांनी या योजनेअंतर्गत आपले खाते उघडले असून ७.३८ लाख कोटी रुपये गुंतवले आहेत. अलिकडेच या योजनेची नियामक संस्था ‘पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी’ (पीएफआरडीए) आणि विमा क्षेत्राची नियामक संस्था ‘इन्शुरन्स रेग्युलेटरी अॅंड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी ऑफ इंडिया’ (आयआरडीएआय) यांनी या योजनेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत. ते खालीलप्रमाणे आहेत:

ई-नॉमिनेशनच्या प्रक्रिया गतीमान

ई-नॉमिनेशनच्या प्रक्रियेत काही बदल करण्यात आले आहेत. सप्टेंबर २०२० मध्ये ‘पीएफआरडीए’ने ऑनलाइन नामांकन करण्याची सुविधा सभासदांना उपलब्ध करून दिली. नोडल ऑफिसकडे अर्ज दिल्यावर त्यांनी तो मंजूर करून ‘सेंट्रल रेकॉर्ड कीपिंग एजन्सी’ (सीआरए)कडे पाठविणे अपेक्षित आहे, परंतु ‘पीएफआरडीए’च्या असे लक्षात आले, की या प्रक्रियेला खूप वेळ लागत आहे. म्हणून त्यांनी आता असा नियम केला आहे, की नामांकनाचा अर्ज नोडल ऑफिसने ३० दिवसात मंजूर अथवा नामंजूर करावा व तसा निर्णय त्यांनी ३० दिवसांत न घेतल्यास तो मंजूर झाला आहे, असे मानून ‘सीआरए’ नामांकन नोंदवेल. सध्या विलंबित असणाऱ्या अर्जांनासुद्धा हा नवा नियम १ ऑक्टोबर २०२२ पासून लागू होईल. या बदलामुळे नामांकनाची प्रक्रिया लवकर पार पडेल अशी अपेक्षा आहे.

ॲन्यूइटीसाठी आता एकच अर्ज

ॲन्यूइटी मिळविण्याच्या प्रक्रियेतही आता बदल करण्यात आला आहे. पूर्वी मुदतपूर्तीच्या वेळी ‘पीएफआरडीए’कडे दोन अर्ज करावे लागायचे. एक ‘एनपीएस’ खाते बंद करण्यासाठी व दुसरा विमा कंपनीकडे ॲन्यूइटी सुरू करण्याबाबत. आता ‘एनपीएस’ खाते बंद करण्याच्या अर्जालाच ॲन्यूइटी खरेदीचा अर्ज मानण्यात येणार आहे. त्यासाठी विमा कंपनीकडे वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

आधार कार्डावर आधारित डिजिटल हयातीचा दाखला मान्य

आता डिजिटल लाइफ सर्टिफिकेट म्हणजे हयातीच्या दाखल्याला मान्यता देण्यात आली आहे. ॲन्यूइटीची रक्कम मिळविण्याकरता वर्षातून एकदा ‘लाईफ सर्टिफिकेट’ म्हणजेच हयातीचा दाखला विमा कंपनीला द्यावा लागतो. ‘आयआरडीएआय’ने विमा कंपन्यांना सांगितले आहे, की आधार कार्डावर आधारित डिजिटल हयातीचा दाखला म्हणजे ‘जीवन प्रमाणपत्र’ मान्य करावे.

क्रेडिट कार्डाद्वारे पैसे भरण्यास मनाई

‘एनपीएस’च्या दुसऱ्या खात्यावर ऑगस्ट २०२२ पासून क्रेडिट कार्डाद्वारे पैसे भरता येणार नाहीत. एनपीएस-१ खात्यावर सध्या तरी अशा प्रकारे पैसे भरता येतात.

‘एनपीएस’ खातेधारकांनी आणि पेन्शनरनी वरील महत्त्वाचे बदल समजून घेणे हिताचे ठरेल.

(लेखक आर्थिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)