
Job Cuts : आता 'या' कंपनीतही होणार कर्मचारी कपात; 600 कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ
ओयो कंपनी तंत्रज्ञान आणि उत्पादन टीममधील 600 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या माहितीनुसार, अनेक प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबत कंपनीने शनिवारी निवेदनात सांगितले की, विक्री विभागात 250 अधिकाऱ्यांची भरती केली जाणार आहे.
कंपनीच्या वतीने असे सांगण्यात आले की, "OYO उत्पादन, अभियांत्रिकी, कॉर्पोरेट मुख्यालय आणि OYO व्हेकेशन होम टीमचा आकार कमी करत आहे. दुसरीकडे कंपनी रिलेशनशिप मॅनेजमेंट आणि बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये लोकांना जोडणार आहे.
हेही वाचा : वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून
कंपनी कर्मचाऱ्यांची दहा टक्के कपात करणार आहे. या अंतर्गत कंपनी 260 नवीन कर्मचारी नियुक्त करताना 600 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करेल. कंपनीचे उत्पादन आणि अभियांत्रिकी विभागांचे विलीनीकरण करणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
OYO चे संस्थापक आणि ग्रुप सीईओ रितेश अग्रवाल म्हणाले, “नोकऱ्या गमावणाऱ्यांपैकी बहुतेकांना योग्य नोकऱ्या मिळतील याची आम्ही खात्री देत आहोत. कंपनीसाठी अमूल्य योगदान देणाऱ्या या सहकाऱ्यांपासून आम्हाला वेगळे व्हावे लागले हे दुर्दैव आहे. OYO ची वाढ होत असताना आणि भविष्यात यापैकी काही कर्मचार्यांची गरज भासत असताना, आम्ही आधी आमच्या कर्मचार्यांपर्यंत पोहोचू आणि अधिक काम देऊ.
हॉटेल एग्रीगेटर कंपनी पुढील वर्षी IPO लाँच करण्याच्या तयारीत आहे. पण कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे रुळावरून घसरलेल्या कंपनीचा व्यवसाय अद्याप मार्गी लागलेला नाही. कंपनीने याआधीही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे आणि आता पुन्हा एकदा 600 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.