पैशाच्या गोष्टी: तुम्हाला श्रीमंत व्हायचंय?

किरण जाधव 
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

श्रीमंत व्हावं, असं कोणाला वाटत नाही? पण, या जगात कोणीही अपघाताने श्रीमंत होत नाही. संपत्ती निर्माण करण्यासाठी, श्रीमंत होण्यासाठी आवश्‍यक असलेल्या गोष्टी करण्याचा निश्‍चय करावा लागतो. यासाठी सर्वांत आधी आपल्या मानसिकतेत करावा लागणारा बदल महत्त्वाचा आहे. यानिमित्ताने श्रीमंत होण्यासाठी जे काही नियम आणि सवयी पाळण्याची गरज असते, त्यावर एक नजर टाकूया.

श्रीमंत व्हावं, असं कोणाला वाटत नाही? पण, या जगात कोणीही अपघाताने श्रीमंत होत नाही. संपत्ती निर्माण करण्यासाठी, श्रीमंत होण्यासाठी आवश्‍यक असलेल्या गोष्टी करण्याचा निश्‍चय करावा लागतो. यासाठी सर्वांत आधी आपल्या मानसिकतेत करावा लागणारा बदल महत्त्वाचा आहे. यानिमित्ताने श्रीमंत होण्यासाठी जे काही नियम आणि सवयी पाळण्याची गरज असते, त्यावर एक नजर टाकूया.

1) दिरंगाई करू नये: "मला हे इतक्‍यात शक्‍य नाही. पुढील वर्षी पगारवाढ झाल्यावरच मी गुंतवणूक करीन,' हे वाक्‍य आपण अनेकांच्या तोंडून ऐकलेलं आहे. कोणत्याही गोष्टीत दिरंगाईची सवय वाईटच. मात्र, गुंतवणुकीबाबत दिरंगाई केल्यास आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात, त्यामुळे गुंतवणुकीला सुरवात करण्यास उशीर करू नये. तुम्ही जेवढा उशीर कराल, तेवढी परिस्थिती तुमच्या विरोधात जाईल. चक्रवाढ पद्धतीचा परिणाम दिसून येण्यासाठी काही वेळ जावा लागतो. यामुळेच आता पुढची पगारवाढ होण्याची वाट पाहू नका. याउलट जसजसे तुमचे उत्पन्न वाढेल, तसतशी गुंतवणुकीची रक्कम वाढवा. तुम्ही जेवढा उशीर कराल, तेवढा तुम्हाला त्या रकमेचा फायदा मिळण्यास उशीर होईल. तुम्ही दहा वर्षांच्या कालावधीसाठी केलेल्या दरमहा दोन हजार रुपये गुंतवणुकीचे मूल्य हे तुम्ही पाच वर्षांमध्ये दरमहा गुंतवलेल्या चार हजार रुपयांच्या गुंतवणुकीपेक्षा नेहमीच जास्त असेल. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (सेन्सेक्‍स) गेल्या 36 वर्षांत 16 टक्के (सीएजीआर) दराने परतावा (उत्पन्न) दिला आहे. मात्र, ज्या वेगाने सध्या भारताचा आर्थिक विकास होत आहे, तो लक्षात घेता तुम्हाला निश्‍चितच यापेक्षा चांगला परतावा मिळू शकतो. थोडक्‍यात सांगायचे, तर गुंतवणुकीला आताच सुरवात करा!

2) "टिप्स' किंवा निरुपयोगी सल्ले घेणे बंद करा: गुंतवणूक करताना निरुपयोगी "टिप्स' किंवा सल्ल्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणेच हिताचे असते. "टिप्स' या "गुंतवणूकदारां'साठी नसतात. शेअर्स असो किंवा म्युच्युअल फंड यांसारख्या इक्विटी प्रकारांत गुंतवणूक करताना ठाम निर्णय महत्त्वाचा असतो. या क्षेत्राची चांगली माहिती करून घेण्यासाठी तज्ज्ञ जाणकारांना आधी भेटा. "टिप्स'शिवाय "हंचेस' आणि "स्पेक्‍युलेशन्स'देखील टाळलेले बरे. थोडक्‍यात, तुमच्या बचतीशी खेळ करू नका. नातेवाईक किंवा मित्र-मैत्रिणींच्या सांगण्यावरून गुंतवणुकीचे निर्णय घेऊ नका.

3) शेअर बाजारापासून लांब राहू नये: गुंतवणूकदाराचे आर्थिक उद्दिष्ट साध्य न होण्यामागील प्रमुख कारण बचतीचा अभाव हे आहे आणि जरी तुम्ही बऱ्यापैकी बचत करत असाल, पण ती वाढविण्याच्या दृष्टीने काहीच प्रयत्न करत नसाल, तर हेदेखील धोकादायक आहे. शेअर बाजार अस्थिर आणि धोकादायक असल्याचे कारण सांगत जर तुम्ही तेथे गुंतवणूक करण्याचे टाळत असाल, तर तुम्ही त्याच्या संपूर्ण पटलाकडे लक्ष देत नाही, असा अर्थ होतो. दीर्घकालीन गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठरविताना तुमच्या "पोर्टफोलिओ'मध्ये "इक्विटी'ला (शेअर्स) स्थान देणे गरजेचे आहे. असे झाले नाही तर तुमच्या संपूर्ण आर्थिक नियोजनावर फरक पडू शकतो. मात्र, सर्वच पैसे शेअर बाजारात गुंतवावेत, असाही सल्ला मी तुम्हाला देणार नाही. जर तुम्हाला शेअर बाजाराचे संपूर्ण ज्ञान नसेल, तर तुम्ही सुसंगत अशा इक्विटी फंडांमध्ये व्यवस्थित गुंतवणूक करू शकता. गुंतवणूक करताना तुमचे वय, उत्पन्नाचे मार्ग आणि आर्थिक क्षमता यांसारख्या बऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जर तुम्ही शेअर्सऐवजी फक्त रोख, मुदत ठेवी आणि कर्जरोख्यांमध्येच पैसे गुंतविणार असाल, तर हेही चांगले नाही. शेवटी तुमच्या परिस्थितीनुसार तुमच्या गुंतवणुकीचे "ऍलोकेशन' करणे महत्त्वाचे असते. यासाठी चांगल्या आर्थिक सल्लागाराला भेटून तुमची आर्थिक उद्दिष्टे निश्‍चित करा आणि योग्य दिशेने गुंतवणुकीला सुरवात करा. कारण, गुंतवणुकीच्या विश्‍वातही यशाला "शॉर्टकट' नसतोच!
(लेखक प्रीसिजन इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेसचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत.)

Web Title: paishachya goshti