esakal | Petrol, diesel prices today: पेट्रोलपाठोपाठ डिझेलही शंभरीच्या उंबरठ्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

petrol

Petrol prices: पेट्रोलपाठोपाठ डिझेलही शंभरीच्या उंबरठ्यावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद: जिल्ह्यात पेट्रोल पाठोपाठ आता डिझेलही शंभरीच्या उंबरठ्यावर आले आहे. केवळ एका चौकाराची गरज असून, लवकरच शंभरी पार करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे महागाईचा आलेख शिखराकडे निघाला असून, यात अनेकांची आर्थिक घडी विस्कटत आहे. जिल्ह्यात कोनोनाच्या संसर्गाने संकटात सापडलेल्या नागरिकांना आता इंधन दरवाढीचा ‘शॉक’ बसला आहे. कोरोना संपताच पेट्रोल पाठोपाठ डिझेलचेही भाव गगनाला भिडत आहेत.

गेल्या महिन्यात पेट्रोलने ऐतिहासिक टप्पा ओलांडला होता. प्रतिलिटर १०० रुपयांपेक्षा जास्तीची भाववाढ झाल्याने अनेकांना आर्थिक फटका सहन करावा लागला. त्याशिवाय घरगुती वापराचा गॅसही महागल्याने महिला वर्गाचे गणित चांगलेच कोलमडले. एकाच वेळी तब्बल २५ रुपयांची वाढ करण्यात आल्याने सामान्य नागरिकांना दरवाढीचा ‘शॉक’ बसला आहे. जिल्ह्यात आता डिझेलचीही मोठी भाववाढ होत आहे. सध्या डिझेल ९६ रुपये एक पैसा या दराने विकले जात आहे. हेच गेल्या महिन्यात ९० पेक्षाही कमी होते. महिन्यातच तब्बल १० रुपयांच्या पुढे दर सरकले आहेत. त्यामुळे डिझेलही दरवाढीचा ऐतिहासिक टप्पा ओलांडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

हेही वाचा: कराडांच्या निवडीनंतर जल्लोष केल्याने कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

डिझेल दरवाढीचा सर्वाधिक फटका-
डिझेलवर चालणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. एस.टी. बससेवा, ट्रॅक्सी या डिझेलवर चालतात. त्यामुळे यामध्ये थोडीही दरवाढ झाली तरीही त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसतो. भाजीपाला, किराणामाल आदी साहित्य तत्काळ महागते. परिणामी, सामान्य वर्गाचा खिसा कापला जातो. त्यामुळे डिझेल दरवाढही महागाईचे संकेत असल्याचे बोलले जात आहे.

डिझेलचे दर वाढल्याने तेल, शेंगदाणे, प्रवास खर्च, चहा अशा किराणा साहित्याचे दर वाढले आहेत. एकूणच सर्वच दरवाढ झाली आहे. याचा फटका आम्हाला बसत आहे. ही दरवाढ मागे घेण्यात यावी.
- अनिल देशमुख, उस्मानाबाद.

डिझेल दरवाढीमुळे आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. आमचे फूटवेअरचे दुकान आहे. यापूर्वी मालवाहतूकीस लागणारा खर्च कमी होता. आता तो डबल झाल्याने ग्राहकांकडून तसा प्रतिसाद मिळत नाही. परिणामी, व्यवसायात तूट आली आहे.
- नीलेश वाघमारे, उस्मानाबाद.

loading image