इतका मोठा प्रवास शक्‍य नाही - चोक्‍सी

वृत्तसंस्था
बुधवार, 26 डिसेंबर 2018

मुंबई - पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) गैरव्यवहार प्रकरणातील फरार आरोपी मेहुल चोक्‍सी याने भारतात येण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. प्रकृती अस्थवास्थामुळे अँटिंग्वात ते भारत असा 41 तासांचा प्रवास करणे आपल्याला शक्‍य नसल्याचे त्याने विशेष न्यायालयास (पीएमएलए) लेखी कळविले आहे.

चोक्‍सीने वकिलांमार्फत न्यायालयात आपली बाजू मांडली असून, त्यात त्याने फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याविषयी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) केलेली याचिका रद्द करण्याची विनंती न्यायालयास केली आहे. थकीत कर्ज भरण्यासंदर्भात बॅंकेशी आपली बोलणी सुरू असल्याचा दावा करतानाच ही बाब 'ईडी' जाणीवपूर्वक न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत नसल्याचा आरोपही चोक्‍सीने केला आहे. जप्त केलेल्या मालमत्तांचे मूल्य 'ईडी'कडून कमी दाखविले जात असून, जप्त मालमत्तांचे मूल्य 89 ते 537 कोटी रुपयांच्या घरात असल्याचा दावा चोक्‍सीने केला आहे.

दरम्यान, भारतातून फरार झाल्यानंतर चोक्‍सीने अँटिंग्वात आश्रय घेतला असून, त्याच्याकडे तेथील नागरिकत्वही आहे. इंटरपोलने नुकतीच त्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे.

प्रकरणाचा तपास कासवगतीने
आपल्याशी संबंधित प्रकरणाचा तपास कासवगतीने सुरू असल्याचे मेहुल चोक्‍सीने म्हटले आहे. तपासाचा हा वेग पाहता खटल्याचे प्रत्यक्ष कामकाज सुरू होण्यास आणखी काही वर्षांचा कालावधी लागेल, अशी टिप्पणीही चोक्‍सीने आपल्या 34 पानी उत्तरात केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PNB Scam Mehul Choksi Sickness Court