
RBI Repo Rate : रेपो दरवाढीची शक्यता
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) रेपो दरात पाव टक्का वाढ करू शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ‘आरबीआय’ची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक आजपासून सुरू झाली असून, ती आठ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या बैठकीत रेपो दरवाढीबाबत निर्णय घेतला जाईल.
रेपो दरात ०.२५ टक्क्यांपर्यंत वाढ केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे रेपो दर सध्याच्या ६.२५ टक्क्यांवरून ६.५० टक्के होईल. अमेरिकी फेडरल रिझर्व्हने आपल्या व्याजदरात पाव टक्क्याने वाढ केली आहे.
तसेच बँक ऑफ इंग्लंडनेही व्याजदरात अर्धा टक्के दरवाढ केली आहे. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकही व्याजदरवाढ करेल, अशी अटकळ बांधली जात आहे. मात्र फेडरल रिझर्व्ह बँकेने आगामी काळात व्याजदरवाढ केली, तरी ती खूप मोठी नसेल, असे सुतोवाच केले आहे. त्यामुळे ‘आरबीआय’ही फार मोठी दरवाढ करणार नाही, अशी अपेक्षा या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.
‘आरबीआय’ने महागाई नियंत्रणात ठेवण्याला प्राधान्य देत व्याजदरवाढीची उपाययोजना राबविली असून, आतापर्यंत पाच वेळा एकूण २.२५ टक्क्यांनी रेपो दर वाढवला आहे. चालू आर्थिक वर्षाची पहिली बैठक एप्रिलमध्ये झाली.
त्यावेळी रेपो दर कोणतीही वाढ न करता चार टक्क्यांवर स्थिर ठेवला. पण त्यानंतर जागतिक स्तरावर झालेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ‘आरबीआय’ने दोन व तीन मे रोजी तातडीची बैठक बोलावून रेपो दरात ०.४० टक्क्यांनी वाढ करून तो ४.४० टक्के केला. २२ मे २०२० नंतर रेपो दरात ही वाढ करण्यात आली.
जूनमध्ये रेपो दरात अर्ध्या टक्क्याने वाढ करून तो ४.९० टक्के करण्यात आला. त्यानंतर ऑगस्टमध्ये तो पुन्हा अर्ध्या टक्क्याने वाढवून ५.४० टक्क्यांवर नेण्यात आला. सप्टेंबरमध्ये त्यात आणखी अर्धा टक्क्याची भर पडली आणि रेपो दर ५.९० टक्के झाला. त्यानंतर डिसेंबरमध्ये व्याजदर ०.३५ टक्के वाढवून ६.२५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला. आता त्यात आणखी पाव टक्का वाढ झाल्यास तो ६.५० टक्के होईल. यामुळे कर्जाचे व्याजदर वाढणार असून, कर्जदारांच्या मासिक हप्त्यात वाढ होईल.