डायनॅमिक बाँड फंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prasad Sangam writes about Dynamic Bond Fund investment share market finance

डायनॅमिक बाँड फंड ही डेट फंडांची श्रेणी गुंतवणूकदारांच्या सर्व शंका-संभ्रम दूर करण्यास उपयुक्त

डायनॅमिक बाँड फंड

- प्रसाद संगम

रोखे संलग्न फंडांमध्ये अर्थात डेट फंडांमध्ये गुंतवणुकीचा प्रश्न येतो तेव्हा व्याजदर, चलनवाढ, अर्थव्यवस्थेची परिस्थिती, मध्यवर्ती बँकेचे पतधोरण यासारखे विविध निकष महत्त्वाचे ठरतात. या गुंतागुंतीमुळे अनेकदा गुंतवणूकदारांना रोखे संलग्न फंडांमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेणे कठीण होते. अशावेळी डायनॅमिक बाँड फंड ही डेट फंडांची श्रेणी गुंतवणूकदारांच्या सर्व शंका-संभ्रम दूर करण्यास उपयुक्त ठरते.

डायनॅमिक बाँड फंड ही सक्रियपणे नियत कालावधीत व्यवस्थापित केली जाणारी योजना असून, ती गुंतवणूकदारांना स्थिर परतावा मिळवून देण्यास मदत करते. या फंडात, गुंतवणूकदारांना बदलत्या व्याजदराच्या आवर्तनानुसार त्यांच्या पोर्टफोलियोत बदल करण्याची चिंता करावी लागत नाही.

गुंतवणूकदारांना या फंडाद्वारे दीर्घ कालावधीसाठी वाजवी परतावा, कर सवलत, चांगली तरलता आणि कॉर्पोरेट बाँड्स व सरकारी रोख्यांमधील वैविध्यामुळे लवचिक पोर्टफोलिओचा लाभ घेता येतो. एकंदरीत कमी जोखीम आणि मोठा परतावा यासह सुरक्षितता अशी वैशिष्ट्ये या योजनेत दिसून येतात.

सर्वसामान्यतः जेव्हा व्याजदर कमी होणे अपेक्षित असते, तेव्हा डायनॅमिक बाँड फंड हे त्यांच्या गुंतवणुकीचा कालावधी वाढवतात आणि भांडवली वृद्धीपासून फायदा मिळवण्यावर लक्ष केंद्रित करतात. जेव्हा व्याजदर वाढण्याची शक्यता असते, तेव्हा ते बाजारातील नुकसानाची जोखीम कमी करण्यासाठी हा कालावधी कमी करतात.

त्यामुळे, जेव्हा व्याजदर जास्त असतात, तेव्हा ही योजना दीर्घ कालावधी योजनेप्रमाणे आणि व्याजदर कमी असतात तेव्हा एका संचयी योजनेसारखी असते. त्यामुळे योग्य आवर्तनासाठी योग्य फंड निवडण्याच्या कटकटीपासून गुंतवणूकदार मुक्त होतात.

सध्याच्या बाजाराच्या स्थितीनुसार, डायनॅमिक बाँड फंड योग्य आहेत. कारण परताव्याचे चक्र (यील्ड कर्व्ह) हे मध्यम उतार दर्शविणारे आहे. अशा योजना चांगल्या परताव्यासाठी वेगवेगळ्या कार्यकालात विकेंद्रीत मालमत्तेत मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीच्या साह्याने दीर्घावधीसाठी चांगला परतावा आणि उत्तम तरलतेचा लाभ देणारे पर्याय सादर करतात. दीर्घ कालावधीत आणि विविध बाजार चक्रांमध्ये, डायनॅमिक बाँड फंड पारंपरिक निश्चित उत्पन्न साधनांपेक्षा चांगला परतावा देतात. या श्रेणीतील फंड हे सर्व प्रकारच्या बाजारस्थितीत आणि आवर्तनांमध्ये रोखे संलग्न गुंतवणुकीचा पर्याय आहेत. हे लक्षात घेता, ते एखाद्याच्या पोर्टफोलिओचा मुख्य भाग ठरू शकतात.