खासगी फंडांची पुंजी धोक्‍यात

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 जानेवारी 2019

मुंबई - निवृत्ती वेतन आणि भविष्य निर्वाह निधीतील (पेन्शन आणि प्रॉव्हिडंट फंड) कोट्यवधी गुंतवणूकदारांची आयुष्यभराची जमापुंजी धोक्‍यात आली आहे. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या ‘आयएल अँड एफएस’ समूहात निवृत्ती वेतन आणि भविष्य निर्वाह निधीचे व्यवस्थापन करणाऱ्या खासगी फंडांनी १५ ते २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, यात मोठे नुकसान झाल्याचा दावा एका वृत्तामध्ये करण्यात आला आहे. 

आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असेपर्यंत ‘आयएल अँड एफएस’ समूहातील आयएल अँड एफएस फायनान्शिअल सर्व्हिसेस या कंपनीने भांडवली गरज भागवण्यासाठी बॅंका, म्युच्युअल फंड कंपन्या, बिगर बॅंकिंग वित्त संस्था आणि खासगी पेन्शन आणि प्रॉव्हिडंट फंडांकडून निधी उभारला होता. रोख्यांच्या माध्यमातून अनेक संस्थांत्मक गुंतवणूकदारांनी यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. तशाच प्रकारे पेन्शन आणि प्रॉव्हिडंड फंडांनी सुमारे १५ ते २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक रोख्यांमधून केली आहे. 

‘आयएल अँड एफएस’ आर्थिक संकटात सापडल्याने पेन्शन फंडांच्या गुंतवणुकीवर जोखीम वाढली आहे. प्रॉव्हिडंट फंडांकडे ‘आयएल अँड एफएस’चे ४० टक्के बाँड्‌स आहेत. मात्र यात पेन्शन फंडातून आणि प्रॉव्हिडंट फंडाचे नेमके गुंतवणूक प्रमाण स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, या गुंतवणुकीवर मोठे नुकसान होण्याची शक्‍यता असून, याचे पडसाद पेन्शन फंडांच्या परताव्यावर दिसून येतील, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

आर्थिक संकट गडद
‘आयएल अँड एफएस’ची आर्थिक स्थिती सप्टेंबरपासून ढेपाळली आहे. रोख्यांवरील परतावा देण्यात कंपनी अपयशी ठरली असून, कर्जाचा डोंगर झपाट्याने वाढत आहे. ‘आयएल अँड एफएस’वर जवळपास ९१ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. यात ६१ टक्के बॅंकेची कर्जे आणि ३३ टक्के डिबेंचर आणि कमर्शिअल पेपर आहेत. त्यामुळे कंपनीच्या विदेशातील प्रकल्पांवर कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे. आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी कंपनीकडून स्थावर मालमत्ता, हाती असलेल्या महामार्ग प्रकल्पांची विक्री करण्याच्या पर्यायाची चाचपणी केली जात आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Private Fund Danger IL and FS