पुणे जिल्हा बॅंकेला २२० कोटींचा नफा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला (पीडीसीसी) सरत्या आर्थिक वर्षात (२०१८-१९) तब्बल २२० कोटींचा ढोबळ नफा झाला आहे.

पुणे - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला (पीडीसीसी) सरत्या आर्थिक वर्षात (२०१८-१९) तब्बल २२० कोटींचा ढोबळ नफा झाला आहे. बॅंकेच्या स्थापनेपासून आजतागायतच्या १०१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच नफ्याचा एवढा मोठा विक्रम झाल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी शुक्रवारी (ता. ५) दिली. 

गेल्या वर्षभरात बॅंकेने थकबाकी वसुलीवर मोठा भर दिला होता. त्यामुळे वसुली चांगली झाली. त्यामुळेच हे शक्‍य झाले. कारण नोटाबंदीमुळे बॅंकेचे सुमारे पावणेसहाशे कोटी रुपये किमान वर्षभर बॅंकेत तसेच पडून होते. त्यामुळे या रकमेवरील वर्षभराचे व्याज बुडाले. शिवाय कर्जमाफीच्या निर्णयामुळे कर्जावरील रकमेचे व्याज बॅंकेलाच भरावे लागले होते आणि अजूनही बॅंकेच्या २२ कोटी २५ लाख रुपयांच्या एक हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा तशाच बॅंकेकडे पडून आहेत. या तीन बाबींमुळे मोठे आर्थिक नुकसान होऊनही नफ्याचा हा विक्रम झाल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘जिल्हा बॅंकेची मार्च २०१९ अखेरची एकूण उलाढाल पंधरा हजार ५५० कोटी रुपयांची आहे. सद्यःस्थितीत बॅंकेचे दहा हजार ९०५ सभासद आहेत. त्यापैकी नऊ हजार १७३ सहकारी संस्था आणि एक हजार ७३२ व्यक्ती सभासद आहेत. भागभांडवल २९५ कोटी ४५ लाख रुपयांचे आहे. आतापर्यंत बॅंकेने साखर कारखाने, पतसंस्था आणि वैयक्तिक कर्जदार आदींना सहा हजार ६०० कोटींचे कर्जवाटप केलेले आहे. गुंतवणूक चार हजार ६३८ कोटी १७ लाख रुपयांची आहे. सध्या बॅंकेचे नेटवर्थ ७४३ कोटी सहा लाख रुपयांचे आहे.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune district bank profit of 220 crores