पंजाब नॅशनल बॅंकेला ३८०० कोटींचा फटका

वृत्तसंस्था
Tuesday, 9 July 2019

दिवाळखोरीचा दावा अंतिम टप्प्यात
भूषण स्टीलच्या थकीत कर्जप्रकरणी बॅंकेने १ हजार ९३२.४७ कोटींची तरतूद केली आहे. भूषण स्टील विरोधातील दिवाळखोरीचा दावा राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे अंतिम टप्प्यात आहे. यातून थकीत कर्जांची मोठी रक्कम वसूल होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. भूषण स्टीलच्या संचालकांविरोधात ‘सीबीआय’ने स्वत:हून गुन्हा नोंदवला आहे.

मुंबई - सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बॅंकेने (पीएनबी) आणखी एक गैरव्यवहार झाल्याची माहिती रिझर्व्ह बॅंकेला दिली आहे. भूषण पॉवर अँड स्टील या कंपनीच्या थकीत कर्जांशी संबंधित (एनपीए) विविध शाखांतून तब्बल ३ हजार ८०५ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे ‘पीएनबी’ने म्हटले आहे. 

यापूर्वी हिरेव्यापारी नीरव मोदी याने बनावट कागदपत्रांच्या आधारे बॅंकेची १३ हजार ७०० कोटींची फसवणूक केली होती. या बड्या गैरव्यवहारातून बॅंक सावरत नाही तोच दुसरा गैरव्यवहार उघड झाल्याने बॅंकांच्या कॉर्पोरेट कर्ज वितरणाच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘पीएनबी’ला शनिवारी (ता. ६) हा गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले. चंडिगड येथील कॉर्पोरेट शाखेत ३ हजार १९१ कोटी, दुबईतील शाखेत ३४५.७४ कोटी आणि हाँगकाँग येथील शाखेत २६७.९० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले असून, बड्या १२ कर्जबुडव्यांपैकी एक असलेल्या भूषण पॉवर अँड स्टील कंपनीने ताळेबंदात फेरफार करून बॅंकांकडून कर्जे घेतली आहेत. कर्जाची रक्कम इतरत्र वळवल्याचा आरोप बॅंकेने केला आहे. न्यायसाहाय्यक हिशेब तपासणी अहवालात (फॉरेन्सिक ऑडिट) हा गैरव्यवहार उघड झाल्याची माहिती बॅंकेकडून देण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punjab national Bank 3800 Crore Loss Malpractices