राधाकिशन दमानींकडून डी-मार्टच्या 62 लाख शेअरची विक्री...

वृत्तसंस्था
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

डी-मार्ट या प्रसिद्ध आणि आघाडीच्या रिटेल साखळी व्यवसायाचे संस्थापक राधाकिशन शिवकिशन दमानी यांनी कंपनीतील आपला काही हिस्सा विकला आहे.

मुंबई: डी-मार्ट या प्रसिद्ध आणि आघाडीच्या रिटेल साखळी व्यवसायाचे संस्थापक राधाकिशन शिवकिशन दमानी यांनी कंपनीतील आपला काही हिस्सा विकला आहे. डी-मार्टची प्रवर्तक कंपनी असेलल्या अवेन्यू सुपरमार्ट्सच्या 62.3 लाख शेअरची विक्री केली आहे. कंपनीतील हिश्याच्या 0.998 टक्के इतके हे प्रमाण आहे. शेअर बाजारात नोंदणी केलेल्या कंपन्यांमध्ये सर्वसामान्य शेअरधारकांचा हिस्सा किमान 25 टक्के असावा या नियमाच्या अंमलबजावणीच्या संदर्भात दमानी यांनी हा निर्णय घेतला आहे. 9 ऑगस्टला दमानी यांनी कंपनीतील आपल्या हिश्यातील 62.3 लाख शेअरची विक्री करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. 

दमानी यांनी या व्यवहारातील 64 टक्के शेअर सिंगल ब्लॉक डीलद्वारे विकले आहेत. अवेन्यू सुपरमार्केटचे 40 लाख शेअर दमानी यांनी 1,404.10 प्रति शेअर या भावाने विकले आहेत. या व्यवहाराचे मूल्य 561.64 कोटी रुपये इतके आहे. जून 2019ला कंपनीतील प्रमोटर आणि प्रमोटर ग्रुपचा हिस्सा 81.20 टक्के इतका होता. यातील राधाकिशन दमानी यांच्याकडे कंपनीचे 38.41 टक्के शेअर होते. शेअरच्या या विक्रीनंतर दमानी यांचा कंपनीतील हिस्सा कमी होऊन 37.41 टक्क्यांवर तर एकूण प्रमोटर ग्रुपचा हिस्सा 80.202 टक्क्यांवर आला आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Radhakishan Damani sells 62.3 lakh shares in D-Mart operator Avenue Supermarts