येस बँक प्रकरणात राणा कपूर यांच्या मुलीही आल्या अडचणीत!

टीम ई-सकाळ
Monday, 9 March 2020

राणा कपूर यांना, रोशनी, राधा आणि राखी अशा तीन मुली आहेत. त्यातील रोशनी कपूर काल सायंकाळी ब्रिटिश एअरवेजच्या विमानाने लंडनला निघाल्या होत्या.

मुंबई : येस बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणात संस्थापक राणा कपूर यांना अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी)अटक केलीय. त्यांना 11 मार्चपर्यंत कोठडी देण्यात आलीय. मुंबईच्या सुटीतील विशेष न्यायालयाने त्यांना कोठडी दिली आहे. कपूर यांच्यानंतर आता त्यांचे कुटुंबीय अडचणीत आले आहेत. त्यांच्या पत्नी बिंदू कपूर यांची ईडीनं चौकशी केलीय. आता याप्रकरणात राणा कपूर यांच्या मुलीही अडचणीत आल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

राणा कपूर यांना, रोशनी, राधा आणि राखी अशा तीन मुली आहेत. त्यातील रोशनी कपूर काल सायंकाळी ब्रिटिश एअरवेजच्या विमानाने लंडनला निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांना एअरपोर्टवर अडवण्यात आलं. येस बँक प्रकरणाची चौकशी ईडी मार्फत सुरू असली तरी, त्यात आता सीबीआयनेही उडी घेतली आहे. कपूर यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात लूक आऊट नोटिस काढण्यात आली होती. त्यात रोशनी कपूर यांच्या विरोधात ही नोटिस होती. त्यामुळंच एअरपोर्ट आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांवर पोलिसांमार्फत तपासणी सुरू होती. अशी नोटिस निघाल्यानंतर, एअरपोर्ट आणि महत्त्वाच्या ठिकाणाहून संबंधित व्यक्ती देशात किंवा विदेशात कोठे प्रवास करत असेल, तर त्या व्यक्तीला थांबवण्यात येतं. त्यानुसार, रोशनी कपूर यांना लंडनला जाण्यापासून रोखण्यात आले. एअरपोर्टवरून त्यांना थेट ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्याचे आदेश देण्यात आले होते. ईडीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राणा कपूर यांच्या मुलींच्या घरांवरही छापा टाकून तेथील कागदपत्रांची तपासणी करण्यात आलीय.

येस बँके संदर्भातील इतर बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

आणखी वाचा - येस बँकेत पैसे आहेत? आता चिंता नको!

दरम्यान, येस बँकेवर रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध घातल्यानंतर येस बँकेतील अनेक गैरव्यवहार समोर आले आहेत. येस बँक आणि डीएचएफएल या फायनान्स कंपनीमध्ये झालेल्या कथित व्यवहारा संदर्भात ईडीला चौकशी करायची आहेत. त्यासाठीच ईडीने पाच राणा कपूर यांची  पाच दिवसांची कोठडी मागितली होती. पण, कोर्टाने चौकशीसाठी 11 मार्चपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rana kapoor daughter roshni stopped at mumbai airport while going for London