राणा कपूर यांच्या 20 बनावट कंपन्या; येस बँकेतूनच सगळे व्यवहार

टीम ई-सकाळ
Monday, 9 March 2020

येस बँकेने डीएचएफएल कंपनीला 3 हजार 700 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. डीएचएफएल कंपनीने पुढे 600 कोटी रुपयांचे कर्ज एका कंपनीला दिले.

मुंबई : येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना कथित गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजवाणी संचालनालयाने (ईडी) अटक केलीय. रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध घातल्यानंतर, बँकेतील त्या व्यवहारांची मला कल्पना नाही, अशी प्रतिक्रिया देणाऱ्या राणा कपूर यांनी कुटुंबियांच्या मदतीने बँकेत मोठा गैरव्यवहार केल्याचे सांगितले जात आहे. मर्जीतील व्यक्तींच्या कंपन्यांना धडा धड कर्जे वितरण करण्याचा प्रकार तर आहेच. पण, यातील काही कंपन्या बनावट असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या कारभाराचे अनेक प्रकार आता हळू हळू उघड होत आहेत. येस बँकेतून दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (डीएचएफएल) कंपनीला मोठी रक्कम दिली गेल्याचा कागदोपत्री स्पष्ट होत आहे. हा व्यवहार जवळपास 600 कोटी रुपयांचा असल्याची माहिती आहे. या संदर्भात कपूर यांनी चौकशीत स्पष्टीकरण दिल्याचे सांगण्यात येत आहे. येस बँकेने डीएचएफएल कंपनीला 3 हजार 700 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. डीएचएफएल कंपनीने पुढे 600 कोटी रुपयांचे कर्ज एका कंपनीला दिले. ते कर्ज एनपीएमध्ये गेलेले नाही. संबंधित कंपनी डीएचएफएल कंपनीला अजूनही कर्जाचे हप्ते वेळेत भरत आहे, असा खुलासा कपूर यांच्याकडून करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, राणा कपूर यांच्या पत्नी बिंदू आणि मुली रोशनी, राखी आणि राधा यांच्या मिळून 20 शेल (बनावट) कंपन्या आहेत. या कंपन्यांचे अस्तित्व निव्वळ कागदावर असून, येस बँकेतून या कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर भांडवल आणि कर्ज देण्यात आल्याची माहिती आहे.  त्यामुळेच राणा यांच्या नंतर त्यांच्या पत्नी आणि मुली अडचणीत आल्या आहेत. या व्यवहारांची चौकशी करण्यासाठी ईडीने बिंदू कपूर यांना चौकशीसाठी बोलवले होते. त्यानंतर आता मुलींचीही चौकशी होणार आहे.

येस बँके संदर्भात आणखी बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

आणखी वाचा - राणा कपूर यांच्यामुळं पत्नी, मुलीही आल्या अडचणीत

प्रियंका गांधींचे पेटिंग चर्चेत
राणा कपूर आणि त्यांच्या कुटुंबियांना महागड्या पेंटिंग्जची खूप हौस होती. ईडीने राणा कपूर यांच्या निवासस्थानी टाकलेल्या छाप्यात 44 महागडी पेंटिंग सापडली आहेत. त्यातले एक पेंटिंग काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्याकडून दोन कोटी रुपयांना घेतल्याची माहिती आहे. यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. हा मुद्दा पकडून येस बँक गैरव्यवहारात काँग्रेसला दोषी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पण, काँग्रेसने या आरोपांना प्रत्युत्तर दिले असून, हा व्यवहार प्राप्तिकरात नोंद करण्यात आल्याचा खुलासा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. त्यामुळं काँग्रेसचा या गैरव्यवहारात कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट झालंय. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rana kapoor wife daughter 20 shell companies information marathi