किशोरवयीन युवकाच्या स्टार्टअपमध्ये रतन टाटांची ५० टक्के गुंतवणूक

पीटीआय
Thursday, 7 May 2020

टाटा समूहाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी 'जेनेरिक आधार' या स्टार्टअपचा ५० टक्के हिस्सा विकत घेतला आहे. १८ वर्षीय अर्जुन देशपांडे याने मुंबईत फार्मसी रिटेल चेनसाठी या स्टार्टअप सुरूवात केली आहे. इतर ऑनलाईन फार्मसीपेक्षा आधार जेनेरिक अतिशय स्वस्त: दरात औषधे उपलब्ध करून देते.

* युवकाने सुरू केला फार्मसी स्टार्टअप
* अर्जुन देशपांडे या १८ वर्षांच्या युवकाने दोन वर्षांपूर्वी पालकांच्या मदतीने सुरू केला व्यवसाय
* रतन टाटा यांची गुंतवणूक वैयक्तिक
* मुंबई, पुणे, बंगळूरू आणि ओडिशातील ३० रिटेलरचा सहभाग
* पुढील वर्षभरात गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि दिल्लीत विस्ताराची योजना

टाटा समूहाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी 'जेनेरिक आधार' या स्टार्टअपचा ५० टक्के हिस्सा विकत घेतला आहे. १८ वर्षीय अर्जुन देशपांडे याने मुंबईत फार्मसी रिटेल चेनसाठी या स्टार्टअप सुरूवात केली आहे. इतर ऑनलाईन फार्मसीपेक्षा आधार जेनेरिक अतिशय स्वस्त: दरात औषधे उपलब्ध करून देते. रतन टाटा यांच्याबरोबर झालेल्या करारासंदर्भातील विस्तृत माहिती मात्र अर्जुन देशपांडे आणि आधार जेनेरिककडून अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. 

रतन टाटा यांनी ३ ते ४ महिन्यांपूर्वी अर्जुन देशपांडे यांच्याशी जेनेरिक आधारबद्दल चर्चा केली होती. त्यावेळेस रतन टाटा यांनी आपल्या प्रस्तावासंदर्भात शांतपणे ऐकून घेतले होते, असेही देशपांडे यांनी सांगितले. रतन टाटा सरांनी जेनेरिक आधारचा ५० टक्के हिस्सा दोन दिवसांपूर्वी विकत घेतला आहे आणि यासंदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार आहे, असे अर्जुन देशपांडे यांनी सांगितले आहे. 

रतन टाटा यांनी ही गुंतवणूक वैयक्तिक पातळीवर केली आहे. या गुंतवणूकीचा टाटा समूहाशी काहीही संबंध नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. रतन टाटा यांनी याआधीही ओला, पेटीएम, स्नॅपडील, क्युअरफीट, अर्बन लॅडर, लेन्सकार्ट आणि लायब्रेट अशा असंख्य स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केलेली आहे.

'जेनेरिक आधार'ने सध्या मुंबई, पुणे, बंगळूरू आणि ओडिशातील जवळपास ३० रिटेलर आपल्या साखळीशी जोडलेले आहेत. 'जेनेरिक आधार' या रिटेलर किंवा दुकानांशी नफ्याची विभागणी करते. मात्र या अशा फार्मसींना प्रस्तापित औषधाची दुकाने आणि ऑनलाईन फार्मसीशी स्पर्धा करणे खूप अवघड जाते आहे. 'जेनेरिक आधार'चे मुख्यालय ठाणे येथे आहे. 'जेनेरिक आधार'मध्ये सध्या ५५ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात फार्मसिस्ट, आयटी इंजिनियर आणि मार्केटिंग कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

'पुढील वर्षभरात १,००० छोटी फ्रॅंचाईसी औषधाची दुकाने 'जेनेरिक आधार' अंतर्गत सुरू करण्याचा आणि उर्वरित महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि दिल्ली इत्यादी भागांत विस्तार करण्याची योजना आहे', असे मत अर्जुन देशपांडे याने व्यक्त केले आहे.

'जेनेरिक आधार' मुख्यत: मधुमेह आणि रक्तदाबाशी संबंधित औषधांचा पुरवठा करते. मात्र लवकरच कंपनी कॅन्सरवरील औषधांचीही स्वस्त: दरात विक्री सुरू करणार आहे. पालघर, अहमदाबाद, पंदूचेरी आणि नागपूर येथील डब्ल्यूएचओ-जीएमपी मान्यताप्राप्त औषध निर्मात्यांशी करार केलेले आहेत. कॅन्सरवरील औषधांचा पुरवठा हिमाचल प्रदेशातील बद्दी येथील औषध निर्मात्यांकडून केला जाणार आहे. 

अर्जुन देशपांडे याच्या पालकांचा स्वत:चा व्यवसाय आहे. त्याच्या आईची फार्मास्युटिकल मार्केटिंग कंपनी आहे. ही कंपनी आंतरराष्ट्रीय बाजारात औषधांची विक्री करते. तर अर्जुनच्या वडिलांची ट्रॅव्हेल एजन्सी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratan Tata buys 50 percent stake in Pharmacy chain