अर्थव्यवस्थेला कधी गती येणार? आरबीआय गव्हर्नरांनी दिलं उत्तर

टीम ई-सकाळ
Thursday, 22 October 2020

देशाची अर्थव्यवस्था नोटाबंदी आणि जीएसटीच्या आघातानंतर संथ गतीने वाटचाल करत असतानाच राहिलेली उरली-सुरली कसर कोरोनाच्या विषाणूने भरून काढली. कोरोनाचे संकट आणि त्याला अटकाव करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चांगलाच फटका बसला आहे.

देशाची अर्थव्यवस्था नोटाबंदी आणि जीएसटीच्या आघातानंतर संथ गतीने वाटचाल करत असतानाच राहिलेली उरली-सुरली कसर कोरोनाच्या विषाणूने भरून काढली. कोरोनाचे संकट आणि त्याला अटकाव करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे देशाची आर्थिक घडी मोठ्या प्रमाणावर विस्कटली. आर्थिक उदारीकरणाच्या प्रक्रियेनंतर पहिल्यांदाच कधी नव्हे ते देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) उणे स्वरूपात गेले. 2020-21 या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत देशाचे आर्थिक उत्पन्न घटून -23.9 झाले आहे. त्यानंतर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआयचे) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असल्याचे म्हटले आहे. 

आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बुधवारी अर्थव्यवस्थेच्या ताज्या घडामोडी विषयी बोलताना ती पुन्हा प्रगतीच्या मार्गावर येत असल्याचे म्हटले आहे. माजी अधिकारी आणि वित्त आयोगाचे विद्यमान अध्यक्ष एन के सिंह यांनी लिहिलेल्या 'पोर्ट्रेट्स ऑफ पॉवर : हाफ सेंचुरी ऑफ बीइंग अ‍ॅट रिंगसाइड' या पुस्तकाच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. केंद्रीय बँकांनी घेतलेले निर्णय, तसेच सरकारच्या उदारमतवादी व आर्थिक चलनविषयक आणि वित्तीय धोरणांमुळे देश आर्थिक पुनरुत्थानाच्या जवळ असल्याचे शक्तीकांत दास यांनी यावेळेस सांगितले. 

याशिवाय आपण आर्थिक पुनरुज्जीवन करण्याच्या जवळ पोहोचलो आहे. अशा परिस्थितीत वित्तीय संस्थांकडे विकासाला पाठबळ देण्यासाठी पुरेसे भांडवल असणे महत्वाचे असल्याचे शक्तीकांत दास म्हणाले. तसेच काही वित्तीय संस्थांनी आधीच भांडवल उभे केले आहे. तर काही भांडवल उभे करण्याचा विचार करीत आहेत. आणि येत्या काही महिन्यांत ते नक्कीच भांडवल करतील असा विश्वास त्यांनी यावेळेस व्यक्त केला. कोरोनामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी भारताला वित्तीय वाढीचा मार्ग निवडावा लागणार असल्याचे देखील त्यांनी यावेळेस म्हटले आहे. 

याव्यतिरिक्त, कोरोनाच्या संकटानंतर सरकारला वित्तीय तिजोरी मजबूत करण्यासाठी स्पष्ट आराखडा जारी करावा लागणार असल्याचे मत शक्तीकांत दास यांनी व्यक्त केले. तसेच कोरोनाचे हे संकट परतल्यानंतर भारताच्या पुढील वित्तीय योजनेविषयी सरकार माहिती सादर करेल अशी आशा असल्याचे त्यांनी यावेळेस म्हटले आहे. आणि सध्याच्या परिस्थिती मध्ये आर्थिक आणि वित्तीय दोन्ही धोरणांमध्ये उदार दृष्टिकोन अवलंबला असल्याचे त्यांनी सांगितले.     

     


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RBI Governor Shaktikanta Das said Indications that the countrys economy is on the way to recovery again