इतिहासाची पदवी घेतलेले नवे आरबीआय गव्हर्नर ट्रोल

वृत्तसंस्था
बुधवार, 12 डिसेंबर 2018

मुंबई: उर्जित पटेल यांनी आरबीआय गव्हर्नर पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या शक्तिकांत दास यांच्या विषयी चांगल्या वाईट चर्चांना उधाण आले आहे. त्यातही दास यांची शैक्षणिक पात्रता हा चर्चेचा विषय ठरत आहे. रघुराम राजन, उर्जित पटेल यांसारख्या अर्थशास्त्रातील पार्श्वभूमी असलेल्या 'स्कॉलर' गव्हर्नरांचा उत्तराधिकारी असलेल्या दास यांची शैक्षणिक पात्रता तपासण्यासाठी विकिपीडियाचा आधार घेतला जात आहे.

मुंबई: उर्जित पटेल यांनी आरबीआय गव्हर्नर पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या शक्तिकांत दास यांच्या विषयी चांगल्या वाईट चर्चांना उधाण आले आहे. त्यातही दास यांची शैक्षणिक पात्रता हा चर्चेचा विषय ठरत आहे. रघुराम राजन, उर्जित पटेल यांसारख्या अर्थशास्त्रातील पार्श्वभूमी असलेल्या 'स्कॉलर' गव्हर्नरांचा उत्तराधिकारी असलेल्या दास यांची शैक्षणिक पात्रता तपासण्यासाठी विकिपीडियाचा आधार घेतला जात आहे. आणि त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिल्यानंतर ट्विटर किंवा फेसबुकसारख्या सोशल माध्यमांवर आरबीआयसारख्या संस्थेच्या सर्वोच्च पदावर बसण्यासाठी असणाऱ्या नियमांची खिल्ली उडवली जात आहे. आणि त्याला कारण ठरत आहे शक्तिकांत दास यांची 'मास्टर इन हिस्टरी' ही शैक्षणिक पात्रता. 

तब्बल 37 वर्षे आयएएस म्हणून प्रशासकीय सेवा बजावलेले शक्तिकांत दास यांना 'टिपिकल' आयआयएम किंवा फायनान्स सारखी शैक्षणिक पार्श्वभूमी नसल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. दास यांनी प्रशासकीय सेवेला सुरुवात करण्यापूर्वी इतिहास या विषयात एम ए केले आहे. मात्र, प्रशासकीय सेवा बजावत असतानाच आयआयएम बंगळुरू मधून प्रगत आर्थिक व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. तसेच, पुणे स्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट (एनआयबीएम) मधून डेव्हलोपमेंट बँकिंग आणि संस्थात्मक पत हा कोर्स पूर्ण केला आहे. याशिवाय त्यांनी आर्थिक व्यवस्थापना संदर्भातील काही कोर्सेस देखील पूर्ण केले आहेत. 

महत्वाचे म्हणजे, भारतीय प्रशासनिक सेवेत तामिळनाडूच्या 1980च्या तुकडीतील सनदी अधिकारी राहिलेले शक्तिकांत दास यांची केंद्रीय अर्थमंत्रालयात लक्षणीय कारकीर्द राहिली आहे. 2015 ते 2017 सालात केंद्रीय अर्थव्यवहार सचिव या पदावर कार्यरत असताना, त्यांची मध्यवर्ती बँकेशी आणि तिच्या कामकाजाशी नजीकचे संबंध निर्माण झाले आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेच्या मध्यवर्ती संचालक मंडळात भूमिका बजावली आहे. 15 व्या वित्त आयोगाचेही ते सदस्य राहिले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निश्चलनीकरणाच्या / नोटबंदीच्या अकस्मात निर्णयानंतर, या संपूर्ण प्रक्रियेतून देशभर निर्माण केलेला चलन-कल्लोळाचे जनतेच्या संघटित रोषात रूपांतर होऊ नये, या दृष्टीने आवश्यक नियोजन आणि उपाययोजना करण्यात त्या वेळी केंद्रीय अर्थमंत्रालयात अर्थव्यवहार सचिव म्हणून कार्यरत शक्तिकांत दास यांची प्रमुख भूमिका होती. याच अर्थमंत्रालयातील कंपनी व्यवहार सचिव या पदावरून 31 मे 2017 रोजी ते सेवानिवृत्त झाले. त्या पश्चात ती जी-20 राष्ट्रगटातील पूर्णवेळ प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RBI governor Shaktikanta Das trolls