खुशखबर: आता NEFT सेवा 24 तास होणार उपलब्ध

वृत्तसंस्था
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

एनईएफटी (NEFT) सेवा आता आठवड्यातील सातही दिवस आणि 24 तास उपलब्ध होणार आहे.

 मुंबई: नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर अर्थात एनईएफटी (NEFT) सेवा आता आठवड्यातील सातही दिवस आणि 24 तास उपलब्ध होणार आहे. सध्या एनईएफटी सुविधा ग्राहकांना कामकाजाच्या दिवसांमध्ये विशिष्ट वेळेतच वापरता येते. यापुढे मात्र अशी वेळेची कोणतीही मर्यादा ग्राहकांवर असणार नाहीत. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन मिळावे म्हणून रिझर्व्ह बँकेने हा मोठा निर्णय घेतला आहे. 

डिसेंबर 2019 पासून एनईएफटी सेवा 24×7 उपलब्ध होणार आहे. आज रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने पतधोरणाच्या बैठकीनंतर दिलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे. सध्या नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर सेवा ग्राहकांना सकाळी 8 ते संध्याकाळी 7 या वेळेत कार्यालयीन दिवसांमध्येच दिली जाते. देशातील पेमेंट व्यवस्थेत क्रांतिकारक बदल करण्यासाठी आरबीआय पावले उचलते आहे. त्याआधी 1 जुलै 2019 पासून एनईएफटी सेवा मोफत करण्यात आली आहे. स्टेट बॅंकेसहीत अनेक बॅंकांनी एनईएफटी आणि आरटीजीएस सेवा त्यानंतर निशुल्क केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RBI to make NEFT available 24x7 in boost to digital payments