RBI Policy: चौथ्या तिमाहीपर्यंत देशाचा जीडीपी दर पॉझिटिव्ह होण्याची आशा

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 9 October 2020

आज झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या पत्रकार परिषदेत 2021 च्या आर्थिक वर्षात जीडीपीमध्ये 9.5 टक्क्यांची घसरण होण्याची शक्यता  गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी वर्तवली आहे.

नवी दिल्ली: आज झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या पत्रकार परिषदेत 2021 च्या आर्थिक वर्षात जीडीपीमध्ये 9.5 टक्क्यांची घसरण होण्याची शक्यता  गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी वर्तवली आहे. रिझर्व्ह बँकेच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीची (एमपीसी) तीन दिवसीय बैठक पार पडल्यानंतर पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत रेपो दरात कोणतेही बदल करण्यात आले नसून ते 4 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आल्याचेही दास यांनी सांगितले आहे. याबरोबर आगामी काळात महागाई दर अपेक्षेपेक्षा अधिक राहणार असल्याचे दास यांनी सांगितले आहे. कोरोनामुळे मागणीचा दरही कमी होईल असं दास यांनी सांगितले.

शक्तिकांत दास पत्रकार परिषदेत बोलताना पुढे म्हणाले की, सध्या जागतिक अर्थव्यवस्थेत सुधारणा होत आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल सकारात्मक चिन्हे दिसत आहेत. चौथ्या तिमाहीपर्यंत देशाचा जीडीपीचा दर सकारात्मक होईल अशी आशा आहे. कोरोना काळात प्रथमच जीडीपीचा अंदाज देताना देशाचा जीडीपी 2021-21 या आर्थिक वर्षात जीडीपी 9.5 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता वर्तवली.

 

पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे-

-रेपो रेटमध्ये बदल नाही. रेपो रेट 4 टक्केच असणार आहे.

-डिसेंबर 2020 पासून ग्राहकांना कोणत्याही वेळी आरटीजीएस सुविधेचाही वापर करता येणार. 

-मार्च 2020 पर्यंत रिझर्व्ह बँकेने एक लाख कोटी रुपयांची मदत देण्याची तरतूद 

-कृषी, कंझ्युमर गूड्स, वीज आणि औषध क्षेत्रात तेजीनं वाढ होण्याची शक्यता.

-कोरोनाच्या साथीमुळे संकटात सापडलेल्या मंदावलेल्या अर्थव्यवस्थेबाबत 'उदारमतवादी' भूमिका घेण्याची शक्यता. 

-मागील वर्षभरात खरीप पिकाच्या पेरण्या वाढल्या आहेत.
-धान्याचे उत्पादन विक्रमी पातळीवर राहणे अपेक्षित आहे.
-कोरोनामुळे स्थलांतरित झालेले स्थलांतरित कामगार पुन्हा कामावर येत आहेत. 
-रेपो रेट 4 टक्के ठेवण्यासाठी मॉनेटरी पॉलिसी कमिटीच्या सदस्यांनी एकमताने मतदान केले.-  रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्के आणि सीमांत स्थायी सुविधा (एमसीएफ) दर 4.25 टक्के कायम आहे.
 

 

कोरोना विषाणूविरोधातील लढाईत भारतीय अर्थव्यवस्था निर्णायक टप्प्यात प्रवेश करत आहे. आर्थिक वाढीला पाठिंबा देण्यासाठी आरबीआय आपला उदार दृष्टीकोन कायम ठेवेल, असे शक्तिकांत दास म्हणाले.

देशाचा सप्टेंबर महिन्यातील उत्पादनाचा Purchasing Managers Index(PMI) 58.8 पर्यंत वाढला आहे. ही वाढ 2012 नंतरची सगळ्यात जास्त वाढ ठरली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RBI Monetary Policy LIVE Updates