Paytm, PhonePe, G-Pay ची एक्सक्लुझिव्ह क्यूआर कोड सेवा बंद होणार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

रिझर्व्ह बँकेच्या नव्या निर्णयानुसार, पेटीएम, फोन-पे, गुगल-पे, ॲमेझॉन-पे आणि इतर प्रकारच्या पेमेंट सिस्टीम ऑपरेटर (पीएसओ) यापुढे आपला एक्सक्लुझिव्ह (विशेष) क्यूआर कोड ठेवू शकणार नाहीत.

नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेच्या नव्या निर्णयानुसार, पेटीएम, फोन-पे, गुगल-पे, ॲमेझॉन-पे आणि इतर प्रकारच्या पेमेंट सिस्टीम ऑपरेटर (पीएसओ) यापुढे आपला एक्सक्लुझिव्ह (विशेष) क्यूआर कोड ठेवू शकणार नाहीत. विशेष क्यूआर कोड म्हणजे ज्या क्यूआर कोडचे स्कॅनिंग केवळ त्यांच्या अ‍ॅपद्वारे केले जाऊ शकते. रिझर्व्ह बँकेने सर्व पेमेंट अ‍ॅप्सना ३१ मार्च २०२२ पर्यंत एक किंवा अधिक इंटरऑपरेटेबल (एकापेक्षा जास्त वापरलेले) क्यूआर कोड वापरायला सांगितले आहे.

यंत्रणेची कार्यक्षमता वाढणार
कोणताही ‘पीएसओ’ पेमेंट व्यवहारांसाठी आपला खास क्यूआर कोड सुरू करू शकणार नाही. यामुळे ग्राहक कोणत्याही अ‍ॅपद्वारे कोणत्याही व्यासपीठावर पैसे पाठवू शकतील. यामुळे देशातील यंत्रणेची कार्यक्षमता वाढेल. काहींनी यापूर्वीच इंटरऑपरेटेबल क्यूआर कोड स्वीकारला आहे, परंतु काही ॲप्सनी अजूनही व्यवहारासाठी त्यांचा क्यूआर कोड वेगळा ठेवला आहे. 

हे वाचा - Gold Price : सोने, चांदीच्या दरात घसरण; दिवाळीत वाढणार मागणी

रिझर्व्ह बँकेनं दीपक फाटक यांच्या अध्यक्षतेखाली भारतातील कोडच्या सध्याच्या प्रणालीची समीक्षा कऱण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. या समितीकडे इंटरऑपरेबल क्यू आर कोड वापराबद्दल उपाय सुचवण्याचे काम होते. सध्या दोन क्विक रिस्पॉन्स कोड असून तेच पुढे वापरले जावेत असा निर्णय समितीच्या शिफारशीनंतर घेण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rbi-stops-pso-to-issue-exclusive-qr-code