रिलायन्स आणि ब्रिटिश पेट्रोलियम एकत्रितपणे उभारणार 5,500 पेट्रोल पंप !

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जगातील आघाडीची पेट्रोलियम कंपनी, ब्रिटिश पेट्रोलियम (बीपी) लवकरच संयुक्तपणे पेट्रोलियम रिटेलच्या व्यवसायात उतरणार आहेत.

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जगातील आघाडीची पेट्रोलियम कंपनी, ब्रिटिश पेट्रोलियम (बीपी) लवकरच संयुक्तपणे पेट्रोलियम रिटेलच्या व्यवसायात उतरणार आहेत. या संयुक्त व्यवसायाद्वारे पुढील 5 वर्षात देशबराता 5,500 पेट्रोल पंप उभारण्यात येणार आहेत. या नव्या संयुक्त कंपनीत रिलायन्सचा हिस्सा 51 टक्के तर बीपीचा हिस्सा 49 टक्के असणार आहे. यात रिलायन्सच्या देशभरातील आधीच अस्तित्वात असलेल्या 1,400 पेट्रोल पंपाचाही समावेश केला जाणार आहे. या नव्या प्रकल्पाद्वारे रिलायन्स एव्हिएशन इंधनाच्या क्षेत्रातही विस्तार करणार आहे. सध्या देशातील 30 विमानतळांवर रिलायन्स ही सेवा पुरवते आहे. रिलायन्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी आणि बीपी समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बॉब डुडले यांनी मुंबईत या संयुक्त प्रकल्पाच्या करारावर सह्या केल्या आहेत. 

बीपीबरोबर आमची व्यावसायिक भागीदारी वाढवताना आम्हाला आनंद होतो आहे. बीपी इंधनाच्या वितरणाच्या क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी आहे. आमच्या भागीदारीतून आम्ही इंधनाच्या वितरण व्यवसायाचा विस्तार करणार आहोत. आमच्या भागीदारीतून आम्ही आमच्या ग्राहकांना आंतरराष्ट्रीय सेवा पुरवू शकणार आहोत, असे मत मुकेश अंबानी यांनी व्यक्त केले आहे. तर बीपी बॉब डुडले म्हणाले की, 2020च्या मध्यापर्यत भारत हा जगातील ऊर्जा क्षेत्रातील सर्वात मोठी बाजारपेठ होणार आहे. बीपीने याआधीच भारतात गुंतवणूक केली आहे. भविष्यातही आम्हाला आणखी मोठ्या संधी मिळतील अशी अपेक्षा आहे. भारतात नैसर्गिक वायूच्या संदर्भात काम करण्यासाठी आमची रिलायन्सबरोबर याआधीच भागीदारी आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reliance, BP announce JV to set up 5500 petrol pumps; RIL to hold 51 pct