मुकेश अंबानींच्या जिओचा नवा फंडा; 'कर्मचारी कपात'

मुकेश अंबानींच्या जिओचा नवा फंडा; 'कर्मचारी कपात'

रिलायन्स जिओने आपल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संख्या मोठी कपात केली आहे. त्याचबरोबर जिओने काही कायमस्वरुपी कर्मचारीही कमी केले आहेत. कंपनीच्या खर्चात तसेच नफ्यात वाढ होण्यासाठी जिओने हे पाऊल उचलले आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत रिलायन्स जिओच्या ऑपरेटिंग मार्जिनमध्ये घट झाली होती. जिओने मात्र आम्ही नवीन भरती सुरू ठेवणार असल्याचे त्याचबरोबर खर्चात कपात करण्याचा कोणताही दबाव नसल्याचे म्हटले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिओमधून 5,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे. यामध्ये 500-600 कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. जिओकडे 15,000 ते 20,000 कर्मचारी असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. अर्थात यापेक्षा जास्त कर्मचारी रिलायन्स जिओसाठी काम करतात मात्र ते कंत्राटी कर्मचारी आहेत. बाजारात उतरल्यापासून जिओने वेगवेगळ्या ऑफर्स आणि ग्राहकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र कंपनीचे ऑपरेटिंग मार्जिन दोन वर्षांपासून तेवढेच आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाला यात वाढीची अपेक्षा होती. त्यामुळे ऑपरेटिंग मार्जिन हा जिओसाठी सध्या चिंतेचा विषय आहे. 

31 मार्च 2019 अखेर जिओवरील एकूण कर्ज 67,000 कोटी रुपये इतके होते.

2018-19 या आर्थिक वर्षात देशाच्या 99 टक्के नागरिकांना आपल्या सेवेशी जोडण्यास रिलायन्स जिओ सरसावली आहे. आपल्या वार्षिक अहवालात रिलायन्सने याबाबतची माहिती दिली आहे. 31 मार्च 2018 पर्यंत जिओशी 18.66 कोटी ग्राहक जोडले गेले आहेत. 2016-17 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात 8.3 कोटी ग्राहकांची वाढ झाली आहे. जिओला एका ग्राहकांकडून सरासरी 137 रुपये प्रति महीना महसूल मिळतो. "रिलायन्स जिओ ही जगातली सर्वात मोठी आणि सर्वात वेगाने वाढवणारी मोबाईल सेवा आहे. जिओच्या प्रगतीने जगाला स्तिमीत केले आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे." असे मत रिलायन्सचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी व्यक्त केले. भारतीय टेलिकॉम बाजारपेठेत जिओचे स्थान महत्वाचे आहे. पहिल्याच वर्षी जिओने 23,916 कोटींचा महसूल मिळवला होता. रिलायन्स जिओचे नेटवर्क हे 4 जी तंत्रज्ञानातील सर्वात मोठे नेटवर्क आहे. त्याचबरोबर 5 जी आणि त्यापुढील तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीसाठीसुद्धा जिओ सक्षम आहे. 

मार्च महिना रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल दोघांसाठीही अत्यंत महत्त्वाच ठरला. मार्च महिन्यात एअरटेलने 1 कोटी 45 लाख तर व्होडाफोन आयडियाने 1 कोटी 51 लाख ग्राहक गमावले आहेत. तर त्याउलट रिलायन्स जिओने मात्र आघाडी घेतली आहे. जिओने मार्चमध्ये 94 लाख नवे ग्राहक जोडले आहेत. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे. फेब्रुवारी महिन्यात भारती एअरटेलच्या एकूण ग्राहकांची संख्या 32.51 कोटी इतकी होती. तर एअरटेलची कट्टर प्रतिस्पर्धी कंपनी असलेल्या रिलायन्स जिओकडे 29.72 कोटी ग्राहक होते. दिवसेंदिवस जिओच्या ग्राहकांची संख्या वाढतेच आहे. त्यातच मार्च महिन्यात मुकेश अंबानींच्या मोठी मुसंडी मारत 95 लाख नवे ग्राहक जोडले. 

रिलायन्स जिओने चौथ्या तिमाहीत 840 कोटी रुपयांचा दणदणीत नफा कमावला आहे. संपूर्ण आर्थिक वर्षात रिलायन्स जिओच्या नफ्यात 300 टक्क्यांची प्रचंड वाढ झाली आहे. वर्षभरात जिओने 2,964 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षात जिओला झालेल्या 723 कोटी रुपयांमध्ये 300 टक्क्यांची घवघवीत वाढ झाली आहे. रिलायन्स जिओचे एकूण ग्राहक 30 कोटींवर पोचले आहेत. 


'2018-19 या आर्थिक वर्षात आम्ही अनेक पल्ले गाठले आहेत आणि भविष्यातील रिलायन्सची बांधणी करण्यासंदर्भातील महत्त्वाची पाउले उचलली आहेत. रिलायन्स रिटेलने 1 लाख कोटी रुपयांच्या महसूलाचा महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. तर जिओने 30 कोटी ग्राहकांचा टप्पा पार केला आहे. आमच्या पेट्रोकेमिकल्स व्यवसायाने आतापर्यतचा सर्वाधिक महसूल मिळवला आहे', असे मत रिलायन्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी व्यक्त केले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com