मोदींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रिलायन्स उतरणार काश्मीरमध्ये

वृत्तसंस्था
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

रिलायन्स समुहाने जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला

मुंबई : जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता काश्मीरची दारे सर्वांसाठी खुली झाली आहेत. त्यामुळे रिलायन्स समुहाने जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) कंपनीची मुंबईत आज (सोमवार) 42 वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या बैठकीत मुकेश अंबानी यांनी ही माहिती दिली. रिलायन्स जिओने गेल्या वर्षात मोठी भरारी घेतली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत रिलायन्सचे मोठे योगदान आहे. लोकाभिमुख उद्योग समूह करण्यात यश आल्याचे रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी सांगितले.

अंबानी यांनी काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्याची घोषणेसेह पुलवामा दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च समुह उचलणार असल्याचीही घोषणा केली. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाट त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले होते.

अंबानी म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीर व लडाखबद्दल एक स्वप्न पाहिले आहे. त्यामुळे आमच्या कंपनीने काश्मीर आणि लडाखमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी आम्ही एक टीम बनविली असून, लवकरच ती तेथे जाऊन सर्वेक्षण करेल. येथील गुंतवणूक आम्ही लवकरात लवकर घोषणा करणार आहोत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reliance sees investment opportunities in Jammu and Kashmir