रिझर्व्ह बॅंकेची दिवाळी भेट

shaktikant-das
shaktikant-das

मुंबई  - स्वस्त कर्जाची प्रतीक्षा करणाऱ्या ग्राहकांना रिझर्व्ह बॅंकेने शुक्रवारी व्याजदरात पाव टक्‍क्‍याची कपात करून दिवाळी गिफ्ट दिले. चलनवाढ नियंत्रणामुळे विकासाला झुकते माप देत पतधोरण समितीने एकमताने रेपो दरात ०.२५ टक्‍क्‍याची कपात केली. 

सलग पाचव्यांदा झालेल्या दरकपातीमुळे रेपो दर ५.१५ टक्‍क्‍यांपर्यंत उतरला आहे. या निर्णयामुळे गृह, वाहन आणि इतर कर्जांचे दर कमी होण्याची शक्‍यता असून दिवाळीतील खरेदीला चालना मिळेल.

काही महिन्यांपासून वाहने, ग्राहकोपयोगी वस्तू, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू; तसेच घरांची मागणी घटली आहे. यामुळे चालू वर्षाच्या विकासदरावर परिणाम होण्याची जोखीम वाढली. पतधोरणातील व्याजदर कपातीचा लाभ बॅंकांकडून ग्राहकांना दिला जाईल. यामुळे ऐन दिवाळीत बाजारातील मागणीला प्रोत्साहन मिळेल, असे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे. पाच वेळा व्याजदर कपातीमुळे रेपो दर १.३५ टक्‍क्‍याने कमी झाला आहे. मात्र, त्याचा परिणाम प्रत्यक्ष कर्जदरावर होण्यास वेळ लागेल, असे दास यांनी सांगितले. दरम्यान, ऑक्‍टोबरपासून बॅंकांना बाह्य मानकाशी (एक्‍सटर्नल बेंचमार्क) संलग्न व्याजदर लागू करणे बंधनकारक केले आहे. बहुतांश बड्या बॅंकांनी एक्‍सटर्नल बेंचमार्क म्हणून ‘रेपो दर’ ग्राह्य धरला आहे. त्यामुळे पतधोरणातील व्याजदर कपातीचा लाभ ग्राहकांना मिळण्याची शक्‍यता वाढली आहे.

बॅंकांनी पाव टक्‍क्‍याने कर्जदर कमी केल्यास मासिक हप्त्यातील बचत
कर्ज    मुदत    पूर्वीचा व्याजदर    हप्ता    कपातीनंतर    सुधारित हप्ता    बचत  
३० लाख    २० वर्षे    ८.२० टक्के    २५४६८    ७.९५ टक्के    २५०००    ४६८
२० लाख    २० वर्षे    ८.२० टक्के    १६९७८    ७.९५ टक्के    १६६६७    ३१२
------
वाहन कर्जातील बचत
कर्ज    मुदत    पूर्वीचा व्याजदर    हप्ता    कपातीनंतर    सुधारित हप्ता    बचत
१० लाख    ५ वर्षे    ८.७० टक्के    २०६१३    ८.४५ टक्के    २०४९२    १४५२
५ लाख    ५ वर्षे    ८.७० टक्के    १०३०७    ८.४५ टक्के    १०२४६    ७३२
३ लाख    ५ वर्षे    ८.७० टक्के    ६१८४    ८.४५ टक्के    ६१४८    ४३२

---------
बाजारातील व्याजदर 
रिझर्व्ह बॅंकेचा रेपोदर - ५.१५ टक्के 
बॅंकांमधील कर्जदर - १० ते ११ टक्के 
गृहकर्ज - ८.२० ते १०.५० टक्‍के 
वाहनकर्ज - ८.५० ते १२.७५ टक्के 
वैयक्तिक कर्ज - १२.७५ ते २४ टक्के 
औद्योगिक कर्ज - ८.६५ ते १६.२५ टक्के 

पतधोरणाची वैशिष्ट्ये
रेपो दरात ०.२५ टक्का कपात; रेपो दर ५.१५ टक्के
सलग पाचव्यांदा व्याजदर कपात
विकासदराचा सुधारित अंदाज ६.१ टक्के
सुधारणांमुळे खासगी गुंतवणुकीला चालना 
किरकोळ चलनवाढ ३.५ ते ३.७ टक्के
पुढील पतधोरण ३ ते ५ डिसेंबर २०१९

ठेवीदारांना फटका
एक्‍सटर्नल बेंचमार्कनुसार बॅंकांकडून व्याजदर ठरवले जाणार असल्याने कर्जदारांचा मासिक हप्ता कमी होणार आहे. तरीसुद्धा ठेवीदारांच्या उत्पन्नाला कात्री लागणार आहे. कर्जदराबरोबरच बॅंकांकडून ठेवीदरात कपात केली जाईल. ज्यामुळे ठेवींवर मिळणारे व्याज कमी होणार आहे. सध्या एक वर्ष मुदतीचा ठेवीदर सरासरी ६.५० टक्के आहे. काही महिन्यांपासून बॅंकांकडून व्याजदरात कपात होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com