रेपो दर कपातीनंतरही व्याजदर ‘जैसे थे’च

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 जून 2019

रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीने गुरुवारी (ता. ६) पतधोरण जाहीर केले. बॅंकांनी व्याजदर कमी करून ग्राहकांचा मासिक हप्त्यांचा भार हलका करावा, असे आवाहन आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केले आहे.

मुंबई - चलनवाढीवर पुरेसे नियंत्रण मिळवल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने विकासाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सलग तिसऱ्यांदा प्रमुख व्याजदरात पाव टक्‍क्‍याची कपात केली. यामुळे बॅंकांसाठीचा आरबीआयचा कर्जदर ५.७५ टक्के झाला आहे. मागील तीन पतधोरणांत रेपो दर पाऊण टक्‍क्‍याने (०.७५ टक्के) कमी झाला असला, तरी गृह कर्ज आणि वाहन कर्जाचे दर ‘जैसे थे’च आहेत. 

‘आरबीआय‘ने बॅंकांना वारंवार आवाहन करूनदेखील बॅंकांनी अल्प प्रतिसाद दिल्याने ग्राहकांना स्वस्त कर्जांसाठी प्रतीक्षाच करावी लागण्याची शक्‍यता आहे. 

रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीने गुरुवारी (ता. ६) पतधोरण जाहीर केले. बॅंकांनी व्याजदर कमी करून ग्राहकांचा मासिक हप्त्यांचा भार हलका करावा, असे आवाहन आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केले आहे. ‘आरबीआय‘ने रेपो दर ५.७५ टक्‍क्‍यांपर्यंत कमी केला आहे. सलग तीन पतधोरणात रेपो दर मोठ्या प्रमाणात कमी झाला असला, तरी बॅंकांकडून त्या तुलनेत प्रतिसाद मिळालेला नाही. बाजारातील रोकड उपलब्धता वाढवण्यासाठी आणखी उपाययोजना आवश्‍यक होत्या, असे मत ‘नरेडको’चे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, की रोकड टंचाई आणि चढ्या व्याजदराचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे पतधोरण कपातीचा फायदा सामान्य ग्राहकांना बॅंका कसा देणार, हे पाहावे लागेल, असे डॉ. हिरानंदानी यांनी सांगितले. सलग दोन कपातीनंतर स्थावर मालमत्ता क्षेत्रामध्ये तरलता समस्यांमधील थोडासा सुधार झाला आहे आणि थेट तिसऱ्यांदा केलेली व्याजदर कपात निश्‍चितपणे मोठ्या प्रमाणात रोकड तरलतेची कमतरता भरून काढेल, असा विश्‍वास पोद्दार हाउसिंगचे व्यवस्थापकीय संचालक रोहीत पोद्दार यांनी व्यक्त केला. 

बॅंकांचा हात आखडता 
सध्या बॅंकांचा सरासरी व्याजदर (एमसीएलआर) १०.३० ते १०.५० टक्‍क्‍यांच्या दरम्यान आहे. गृह कर्जाचा दर ८.३० टक्के ते ९ टक्‍क्‍यांच्या दरम्यान आहे. वाहन कर्जाचा दर ८.५० ते ९.३० टक्‍क्‍यांच्या दरम्यान आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये गृह आणि वाहन कर्जात फारशी कपात झालेली नाही. मागील दोन पतधोरणातील कपातीनंतर सार्वजनिक बॅंकांनी ०.१० ते ०.२० टक्‍क्‍याच्या दरम्यान ‘एमसीएलआर’ दर कमी केला होता. खासगी बॅंकांनी केवळ ०.०५ टक्‍क्‍यांनी व्याजदर कमी केले. त्यामुळे ग्राहकांना फारसा लाभ झाला नाही. कर्जाचा मासिक हप्त्यात बदल झालेला नाही. ठेवी दर आणि कर्ज दर यांच्यात ‘मार्जिन’ कमी असल्याने बॅंका व्याजदर कमी करण्यात चालढकल करीत आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात कर्जदर कमी करण्यापूर्वी ठेवींच्या दराला बॅंकांकडून कात्री लावली जाण्याची शक्‍यता आहे.

घरे, वाहन विक्रीला फटका
चढ्या व्याजदरांमुळे स्थावर मालमत्ता क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. गेल्या तीन वर्षांत घरांची विक्रीवर परिणाम झाला असून, गृह कर्जाच्या मागणीत घट झाली आहे. गेल्या दोन महिन्यांत प्रवासी वाहने आणि मोटारींच्या विक्रीत घट झाली असून, वाहन उत्पादकांची चिंता वाढवली आहे. रेपो कपात करून आरबीआयने भूमिका पार पाडली असून, कर्ज स्वस्ताईचा चेंडू बॅंकांच्या कोर्टात टोलावला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reserve Bank reduced interest rates