गरज ‘इमर्जन्सी फंडा’ची!

मकरंद विपट
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

जयने नुकतेच त्याचे शिक्षण पूर्ण केले होते आणि तो एका खासगी कंपनीत कामाला रुजू झाला होता. एक दिवस त्याच्या कंपनीत एका सेमिनारचे आयोजन केले होते. हे सेमिनार होते आर्थिक साक्षरतेविषयी. जयला याची पूर्ण कल्पना होती, की निवृत्तीनंतर त्याला पेन्शन वगैरे काहीही मिळणार नव्हते. त्यामुळे आपला ‘रिटायरमेंट फंड’ आपल्यालाच तयार करावा लागणार, हे त्याला माहीत होते म्हणून तो अगदी आवर्जून या सेमिनारला उपस्थित राहिला. सेमिनारचे वक्ते होते श्री. विजय. विजय हे खूप अनुभवी आणि जाणते आर्थिक सल्लागार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी सर्व उपस्थितांना आर्थिक नियोजनाचे महत्त्व अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितले.

जयने नुकतेच त्याचे शिक्षण पूर्ण केले होते आणि तो एका खासगी कंपनीत कामाला रुजू झाला होता. एक दिवस त्याच्या कंपनीत एका सेमिनारचे आयोजन केले होते. हे सेमिनार होते आर्थिक साक्षरतेविषयी. जयला याची पूर्ण कल्पना होती, की निवृत्तीनंतर त्याला पेन्शन वगैरे काहीही मिळणार नव्हते. त्यामुळे आपला ‘रिटायरमेंट फंड’ आपल्यालाच तयार करावा लागणार, हे त्याला माहीत होते म्हणून तो अगदी आवर्जून या सेमिनारला उपस्थित राहिला. सेमिनारचे वक्ते होते श्री. विजय. विजय हे खूप अनुभवी आणि जाणते आर्थिक सल्लागार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी सर्व उपस्थितांना आर्थिक नियोजनाचे महत्त्व अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितले. जयलाही ते पटले. म्हणून जयने तत्काळ दीर्घ कालावधीसाठी इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायला सुरवात केली. बराच काळ लोटला. सगळे कसे नीट चालले होते. पण, एक दिवस विजय यांना जयचा फोन आला. जय थोडा चिंतीत स्वरात बोलत होता...

जय - विजय सर, माझी इक्विटी म्युच्युअल फंडात ‘एसआयपी’च्या माध्यमातून जी गुंतवणूक तीन वर्षांपूर्वी सुरू केली होती, त्याचे आता किती मूल्यांकन झाले आहे?

विजय - तुझी गुंतवणूक रक्कम ३,६०,००० आहे आणि आताचे मूल्यांकन ४,८५,००० रुपये आहे.

जय - अरे वा... पण सर मला आता यातील २ लाख रुपये काढावे लागतील.

विजय - (आश्‍चर्यचकित होऊन) का रे? का काढायचे आहेत? अरे, हा तर तुझा ‘रिटायरमेंट फंड’ आहे. हे पैसे वेळेच्या अगोदर काढू नकोस, नाहीतर त्याची अपेक्षित वाढ होणार नाही...

जय - पटतंय सर मला तुमचं म्हणणं. पण, काल गावाकडून बाबांचा फोन आला होता. या पावसाळ्यात गावाकडील घराचे बरेच मोठे नुकसान झाले आहे. घराच्या दुरुस्तीसाठी पैसे पाठव, असं सांगत होते. आता एवढ्या कमी कालावधीत पैसे उभे करायचे असतील, तर माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही...

विजय - बघ, तरी मी तुला सांगत होतो, पण तू माझे ऐकले नाहीस. गुंतवणुकीचा निर्णय घेताना तू ‘इमर्जन्सी फंडा’ची व्यवस्था केली नाहीस. त्यामुळे तुला थेट तुझा ‘रिटायरमेंट फंड’च वेळेअगोदर विकावा लागणार. जर तू माझे ऐकून ‘इक्विटी फंडा’तील गुंतवणुकीसोबतच दरमहा थोडी रक्कम ‘लिक्विड फंडा’त टाकली असतीस, तर अशा आर्थिक अडचणींमध्ये ती रक्कम उपयोगी पडली असती आणि तुला दीर्घ कालावधीसाठी केलेली गुंतवणूक वेळेआधी विकावी लागली नसती.

वरील संभाषणातून असे लक्षात येते, की इक्विटी म्युच्युअल फंडातील ‘एसआयपी’ आपण नेहमी दीर्घ कालावधीसाठी चालू करतो. पण, त्याचबरोबर आपण ‘इमर्जन्सी फंडा’ची व्यवस्था कधीच करत नाही आणि मग अडीअडचणीच्या वेळेस आपल्याला दीर्घ कालावधीसाठी चालू केलेली ‘एसआयपी’ मधेच थांबवून वेळेच्या अगोदर विकावी लागते. 

बरेच म्युच्युअल फंड सल्लागार यासंदर्भात सल्ला देत नाहीत आणि जर दिलाच तर बरेच गुंतवणूकदार तो ऐकत नाहीत. त्यामुळे वाचकहो, याचा खूप गांभीर्याने विचार करायला हवा. जोपर्यंत तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करीत आहात, तोपर्यंत आपल्या उत्पनातील १० ते १५ टक्के हिस्सा लिक्विड फंडात दर महिन्याला टाकत जा. ही गुंतवणूक तुमच्या दीर्घ कालावधीसाठी केलेल्या गुंतवणुकीचे संरक्षक म्हणून काम करील. त्यामुळे ‘रिटायरमेंट’सारख्या दीर्घ कालावधीसाठी चालू केलेली गुंतवणूक तुम्हाला वेळेआधी कधीच विकावी नाही लागणार. पाहा पटतंय का?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Retirement Fund Emergency Investment Mutual Fund