'श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब आणखी गरीब' होतोय

वृत्तसंस्था
Monday, 21 January 2019

नवी दिल्ली: गेल्या वर्षभरात देशभरातील अब्जाधीशांच्या संपत्तीत दरदिवशी तब्बल 2200 कोटींची भर पडली आहे. विशेष म्हणजे फक्त 10 टक्के श्रीमंतांकडे देशातील एकूण संपत्तीच्या 77.4 टक्के संपत्ती आहे. तर, देशातील 1 टक्के श्रीमंतांच्या संपत्तीत 39 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर, दुसरीकडे 50 टक्के गरिबांच्या संपत्तीत फक्त 3 टक्क्यांची वाढ झाली आहे. चिंताजनक बाब म्हणजे भारतातील 13.6 कोटी लोक 2004 पासून कर्जदार आहेत आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीत विशेष बदल झालेला नाही. एकंदरीत 'श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब आणखी गरीब' ही परिस्थिती देशात तयार झाली आहे. 

दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या पार्श्वभूमीवर ऑक्सफॅम या संस्थेने हा अहवाल प्रसिध्द केला आहे. देशात व जागतिक पातळीवर असलेली आर्थिक विषमता अहवालातून समोर आली आहे. ‘रिवॉर्ड वर्क, नॉट वेल्थ’असे या अहवालाचे नाव आहे. या अहवालातून भारतातील गरीब आणि श्रीमंतांमधील दरी मोठ्याप्रमाणात वाढत चालल्याचे स्पष्ट झाले आहे. 

जागतिक पातळीचा विचार करता, मागील वर्षात अब्जाधीशांच्या संपत्तीत 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर गरिबांच्या संपत्तीत 11 टक्क्यांनी घट झाली आहे. तर, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांची संपत्तीत वाढ होऊन ती 112 अब्ज डॉलर्सवर पोचली आहे. जेफ बेझॉस यांच्या संपत्तीची इथिओपिया या देशाशी तुलना करता त्यांच्या संपत्तीच्या फक्त 1 टक्का म्हणजे संपूर्ण इथिओपियाचे आरोग्य बजेट आहे. 

भारताचा विचार करता, मागील वर्षात अब्जाधीशांच्या यादीत 19 व्यक्तींची भर पडली आहे. त्यामुळे देशातील एकूण अब्जाधीशांची संख्या 119 वर पोचली आहे. या 119 अब्जाधीशांकडे एकूण 28 लाख कोटींची संपत्ती आहे. तर, भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानींची संपत्ती 2.8 लाख कोटी इतकी आहे. जी भारत सरकारच्या वैद्यकीय, सार्वजनिक स्वास्थ्य, स्वच्छता आणि पाणी पुरवठा या विभागांच्या केंद्र तसेच राज्यांच्या बजेटपेक्षा देखील जास्त आहे. 

ऑक्सफॅमच्या अहवालानुसार, 2018-2022 या कालावधीत भारतात अब्जाधीशांच्या संख्येत 70 ने वाढ होईल. 

ऑक्सफॅमचे भारतातील सीईओ अमिताभ बेहर यांनी 'सरकारकडून शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत गोष्टींवर केला जाणारा खर्च आणि आर्थिक सोयीसुविधांचा लाभ फार थोड्या लोकांपर्यंत पोहोचतो हे अहवालातून दिसून आले आहे.' असे म्हणत या अहवालाबाबत चिंता व्यक्त केली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The rich get richer and the poor get poorer