वाटचाल ऋषी सुनक यांची अभ्यासाची संधी सर्वांसाठी!

आर्थिक क्षेत्रात त्यांचा अनुभव दांडगा आहे.
Rishi Sunak
Rishi Sunaksakal

आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत ब्रिटनच्या सर्वोच्च कार्यकारी पदावर म्हणजेच पंतप्रधान पदापर्यंत पोहोचलेले ऋषी सुनक यांनी याआधी देशाच्या अर्थ विभागाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयात पदवी घेतली असून, स्टॅनफोर्ड विद्यापीठातून व्यवस्थापन विषयात एमबीए केले आहे. शिक्षणानंतर त्यांनी गोल्डमन सॅच या गुंतवणूक कंपनीत काही वर्षे काम केले आहे. आर्थिक क्षेत्रात त्यांचा अनुभव दांडगा आहे.

ब्रिटनच्या याआधीच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी देशातील आर्थिक संकटाचा सामना करण्यात येणाऱ्या अडचणी वाढल्यामुळे राजीनामा दिला होता. देशाच्या आर्थिक स्थितीचा तेथील शेअर बाजारावर वाईट परिणाम झाला असून, आर्थिक अस्थिरता वाढली आहे तसेच पाउंड कमकुवत होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर ऋषी यांना पुढील यांचा पुढील मार्ग खडतर आहे. यातून ते कसा मार्ग काढतात हे जगभरातील अर्थशास्त्र , वित्त आणि गुंतवणूक क्षेत्रातील सर्वांसाठीच उत्सुकतेचे ठरणार आहे. त्या दृष्टीने पुढील मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत.

महागाई आटोक्यात ठेवणे

सर्वसामान्य लोकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे महागाई! वस्तू आणि सेवांसाठीची मागणी जेव्हा पुरवठ्यापेक्षा वेगाने वाढते तेव्हा महागाईचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणजे मागणी कमी करणे किंवा पुरवठा वाढवणे. अल्पकाळात बँकदरांची पुनर्र्चना केली जाते जेणेकरून लोकांची क्रयशक्ती आटोक्यात रहाते, तर दीर्घकाळात वस्तू आणि सेवांचा पुरवठा कसा वाढवता येईल यावर उपाययोजना केली जाते. ऋषी यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळात तेथील महागाईचा कसा मुकाबला केला जातो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

व्याजदर आटोक्यात ठेवणे

ठेवी आणि कर्जावरील व्याजदर वाढवले तर अल्पकाळात महागाई नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. ठेवीवरील व्याजदर वाढल्याने सामान्य लोकांचा कल पैसे खर्च करण्याऐवजी ठेवी ठेवण्याकडे असतो, तर कर्जावरील व्याजदर वाढल्याने सामान्य लोकांचे कर्ज घेण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. याचा एकत्रित परिणाम म्हणजे वस्तू आणि सेवांसाठीची मागणी आटोक्यात राहते, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात याविषयी ब्रिटनमधील सर्वोच्च बँक पुढील निर्णय घेणार आहे. जगभरातील अर्थ क्षेत्रातील अभ्यासकांसाठी हा मुद्दादेखील उत्सुकतेचा ठरणार आहे.

विकासदर सुधारणे

ऋषी सुनक आणि त्यांच्या सहकाऱ्यांपुढील अजून एक महत्त्वाचे आव्हान म्हणजे देशाचा विकास दर सुधारणे. देशातील उपलब्ध भांडवल, साधनसामुग्री, मनुष्यबळ यांची योग्य सांगड घालून त्यांना हे साधावे लागेल. त्यासाठी उत्पादक खर्च आणि अनुत्पादक खर्च यातील सीमारेषा स्पष्ट करून उत्पादक खर्चांवर भर द्यावा लागेल आणि अनुत्पादक खर्च कमीत कमी ठेवावे लागतील. कोरोनाच्या काळात सुनक यांनी अर्थमंत्री या नात्याने सादर केलेल्या लघु अर्थसंकल्पाचा फायदा तेथील रोजगार आणि उद्योगांचे अस्तित्व टिकण्यास झाला होता. येणाऱ्या काळात असाच एखादा निर्णय ते घेतात का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

करांची पुनर्रचना

करांचे दर कमी असावेत अशी सर्वसामान्य लोकांची अपेक्षा असते, तर दुसऱ्या बाजूला करांचे दर जेवढे अधिक तेवढी सरकारची तिजोरी भक्कम होत असते. विकासकामांसाठी आवश्यक असलेला निधी गोळा होण्यासाठी वेळप्रसंगी कटू निर्णय घेऊन सरकारला करांचे दर वाढवावे लागतात;पण त्याचवेळी तळातील जनतेला त्याचा फार मोठा फटका बसणार नाही याची काळजीदेखील घ्यावी लागते. त्यामुळे लोकप्रिय निर्णय आणि कटू निर्णय यांचा मध्य ऋषी आणि त्यांचे सहकारी येणाऱ्या काळात कसे साधतात हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.

कोणत्याही देशातील अर्थव्यस्थेची स्थिती आणि प्रगतीचा थेट संबंध गुंतवणूकदारांना मिळणारा परतावा आणि सामान्य मनुष्याच्या राहणीमानाशी जोडलेला असतो. त्यामुळे ब्रिटनमधील आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी ऋषी सुनक यांची वाटचाल कशी असेल हा आपल्या सर्वांसाठी उत्सुकतेचा आणि अभ्यासाचा विषय ठरणार आहे हे नक्की !

(लेखक इंदिरा ग्लोबल बिझनेस स्कूल, पुणे या संस्थेत संचालक म्हणून कार्यरत आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com