फायनान्शियल पॉर्नपासून सावधान! 

ऋषभ पारख (चार्टर्ड अकाऊंटंट)
Monday, 2 March 2020

जगभरात सर्वत्र दिसून येणारे व्यसन आहे. या व्यसनाबद्दल माहिती नसणारे अनेक सामान्य गुंतवणूकदार त्याचे बळी पडतात.

जगभरात सर्वत्र दिसून येणारे व्यसन आहे. या व्यसनाबद्दल माहिती नसणारे अनेक सामान्य गुंतवणूकदार त्याचे बळी पडतात. फायनान्शियल  पॉर्न  म्हणजे गुंतवणूकदारांना पाँझी स्कीम आणि चुकीच्या वित्तीय उत्पादनांमध्ये गुंतवणूक करण्यास आमिष दाखविणारा सल्ला देण्याचा प्रकार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

गुंतवणुकीच्या ''हॉट टिप्स' किंवा 'ईझी मनी' मिळविण्याचे 'सिक्रेट' या रुपाने हा सल्ला दिला जातो. यातून गुंतवणूकदारांना जास्त 'रिटर्न'चे प्रलोभन दाखवून भुलविले जाते. अल्पकालीन फायद्यासाठी त्याला असुरक्षित गुंतवणुकीच्या पद्धतींचा अंगिकार करावयास लावले जाते. अनेक गुंतवणूकदार अल्पकालीन मोहाला बळी पडतात आणि दीर्घकालीन आनंद गमावून बसतात. अवास्तव खरेदी अथवा वित्तीय बातम्या आणि उत्पादने यांचा गाजावाजा करुन त्यावर खर्च केला जाईल, अशा पद्धतीने 'फायनान्शियल पॉर्न'ची रचना केलेली असते. 

फायनान्शियल पॉर्नचा गुंतवणूकदारांवर परिणाम 
- गुंतवणूकदारांच्या मनात गुंतवणुकीबाबत अवास्तव अपेक्षा निर्माण होते. 
- दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य आणि आनंद गमावणाऱ्या चुकीच्या गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूकदाराला सहभागी करुन घेतले जाते. 
- यामुळे मोठे आर्थिक गैरव्यवहार होतात. 

तुम्हाला 'हे' व्यसन असल्याची लक्षणे  
- पैसे दुप्पट करणाऱ्या योजनांवर अंधपणे विश्वास ठेवणे. 
- 'एसएमएस' आणि 'व्हॉट्सअॅप' मेसेजच्या आधारावर शेअर खरेदी करणे. 
- लॉटरी लागली आहे, अशा आशयाच्या फसव्या 'ई-मेल'वर विश्वास ठेवणे. 
-तुम्हाला भरपूर मिळतील, त्याआधी 'ट्रान्स्फर फी' भरा, अशा फसव्या मेसेजवर विश्वास ठेवणे. 
- अवाजवी परताव्याचे आश्वासन देणाऱ्या धोकादायक योजनांमध्ये सहभागी होणे. 
- मित्र आणि नातेवाईकांनी सुचविलेल्या उथळ 'मनी-मेकिंग' योजनांवर विश्वास ठेवणे. 

अशा प्रकारच्या सापळ्यातून वाचायचे असेल त, सहजपणे मिळणारा कोणताही गुंतवणूक सल्ला टाळा. प्रत्येक टिप्स तपासून पाहा आणि गुंतवणुकीआधी प्रश्न विचारा. थोडक्यात म्हणजे, अल्पकालीन फायद्याचे अव्वाच्या सव्वा 'रिटर्न'चे आश्वासन देणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा, कारण त्या तुमच्या दीर्घाकालीन आनंदाला बाधा आणू शकतात. 

(लेखक मनीप्लँट कन्सल्टन्सीचे संस्थापक असून, त्यांचे ‘फायनान्शिअल स्पिरीच्युअॅलिटी’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे..)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rushabh Parakh Article Beware of Financial Porn