गुंतवणुकीला परदेशात पाठवा; "इंटरनॅशनल फंडां'मध्ये गुंतवणूक करावी का?

गुंतवणुकीला परदेशात पाठवा; "इंटरनॅशनल फंडां'मध्ये गुंतवणूक करावी का?

आंतरराष्ट्रीय बाजारात "पोर्टफोलिओ'चा विस्तार करण्यासाठी अनेक जण  सल्ला देतात. हाच "ट्रेंड' सध्या सगळीकडेच नजरेस पडतोय. विशेषत: परदेशी बाजारांशी निगडित असलेल्या म्युच्युअल फंड योजना लोकप्रिय आणि लक्ष वेधून घेत आहेत. 

अचानक लोकप्रियता का मिळू लागली आहे?
कोरोनाच्या संकटामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरण झाली आहे. दीर्घकाळासाठी गुंतवणूक करायची असेल तर ही योग्य वेळ आहे. उदाहरणच द्यायचे झाल्यास, अमेरिकेसारख्या विकसित देशात गुगल, नेटफ्लिक्स, फेसबुक, ॲमेझॉन, अॅपल, मायक्रोसॉफ्ट या सारख्या जागतिक पातळीवरील आघाडीच्या कंपन्या आहेत. कोरोनामुळे होत असलेल्या उलथापालथीत वाटचाल करण्यास या कंपन्या सक्षम आहेत. बाजारातील घसरणीमुळे या कंपन्यांमध्ये प्रवेश करण्याची चांगली संधीही मिळत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

"इंटरनॅशनल फंड' केव्हा निवडावेत?
"इंटरनॅशनल फंड'मध्ये गुंतवणूक करण्याचे प्राथमिक कारण भौगोलिक विविधता हे असते. वेगवेगळ्या अर्थव्यवस्था एकाच दिशेने वाटचाल करू शकत नाहीत आणि भारतीय बाजार चांगली कामगिरी करीत नसेल तर योग्य परतावा मिळवून देण्यासाठी "इंटरनॅशनल फंड' मदत करू शकतात. यामुळे  पोर्टफोलिओमध्ये "इंटरनॅशनल फंड'चा समावेश अधिक परतावा मिळवून देऊ शकतो. कारण वेगवेगळ्या अर्थव्यवस्थांमध्ये गुंतवणूक केलेली असते. मात्र, हे फायदे काही जोखीम घेऊन येतात याची कल्पना असायला हवी. "रिस्क प्रोफाइल', "फायनान्शिअल गोल' आणि गुंतवणूक उद्दिष्ट हे कायम लक्षात ठेवावे. तुमचे उद्दिष्ट केवळ चांगला परतावा मिळविण्याचे असेल तर ही जोखीम न स्वीकारणेच अधिक चांगले. परदेशी बाजारांमध्ये गुंतवणूक करण्याआधी तुमचा भारतातील पोर्टफोलिओ चांगला आहे का, याची खात्री करा. म्हणजे तो परदेशी बाजारांमध्ये होणाऱ्या अचानक बदलाचे धक्के पचवू शकेल. तुमची गुंतवणूक पीएफ, पीपीएफ, एफडी, रिअल इस्टेट, सोने, म्युच्युअल फंड, स्टॉक आदी "अॅसेट क्लास'मध्ये विभागलेली असायला हवी.  देशाच्या अर्थव्यवस्थेत चांगले "अॅसेट अलोकेशन' केल्याशिवाय परदेशातील गुंतवणुकीचा पर्याय विचारात घेऊ नका. अशा प्रकारची गुंतवणूक ही 'एचएनआय' गुंतवणूकदारांसाठी योग्य असते, कारण ते त्यांचा पाच ते दहा टक्क्यांपर्यंत पैसा परदेशात गुंतवू शकतात. 

"इंटरनॅशनल फंड' तुम्हाला काय साध्य करण्यास मदत करेल?
जर भविष्यात अपत्याला उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवणार असाल अथवा भविष्यात तेथे राहण्याची, काम करण्याची तसेच, कंपनी स्थापन करण्याची योजना असेल तर अमेरिकेत गुंतवणूक करणे ही चांगली कल्पना ठरते. तुम्हाला गुंतवणुकीवर परतावा मिळण्यासोबतच डॉलरच्या वधारलेल्या मूल्यामुळे फायदाही होतो. यातून "डॉलर बकेट' तयार करण्यास मदत होते आणि चलन चढउतारापासून सुरक्षा मिळते. 

जोखीम जाणून घ्या
वेगवेगळ्या अर्थव्यवस्था आणि बाजारांमध्ये गुंतवणूक करून तुमच्या पोर्टफोलिओवर चांगला परतावा मिळवण्यास कायम संधी असते परंतु, यात काही प्रमाणात जोखीमही असते. "इंटरनॅशनल फंड'मध्ये गुंतवणूक करताना प्रामुख्याने दोन प्रकारची जोखीम असते.  पहिली म्हणजे, चलन विनिमय यातील फरक. जर तुम्ही गुंतवणूक करत असलेले चलन रुपयाच्या तुलनेत घसरसल्यास तुमचा परतावाही घसरतो. दुसरी जोखीम म्हणजे, आर्थिक आणि राजकीय बदल हे गुंतवणुकीवर परिणाम करू शकतात. ही जोखीम अनपेक्षित व मोठी असते. 

टॅक्सवरील परिणाम
"लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम' (एलआरएस) अंतर्गत अडीच लाख डॉलरपर्यंत गुंतवणूक करता येते. "इंटरनॅशनल फंड'वरील भांडवली फायदा हा डेट फंडाप्रमाणे गृहीत धरला जातो आणि त्यातून मिळालेल्या फायद्यावर "टॅक्स' लागतो. यामुळे गुंतवणूक केल्यापासून तीन वर्षांत मिळणारा फायदा हा अल्पकालीन भांडवली फायदा असतो आणि तो तुमच्या "टॅक्स स्लॅब'मध्ये समाविष्ट होतो. दीर्घकालीन भांडवली फायद्यासाठी "टॅक्स' वीस टक्के असतो आणि तो "इंडेक्सेशन बेनिफिट'मध्ये गृहीत धरला जातो. 

इंटरनॅशनल फंड कसे निवडावेत?
इंटरनॅशनल फंड विविध आकार आणि प्रकारांमध्ये येतात. विविध देशांतील विकसित ते विकसनशील बाजारांमध्ये गुंतवणुकीसोबत सोने, टेक्नॉलॉजी आणि कृषी यासारख्या क्षेत्रातही गुंतवणूक करणारे फंडही आहेत. अमेरिका आणि युरोपीय बाजार जागतिक बाजारांमध्ये मोठी भूमिका बजावत असल्याने गुंतवणूकदाराने त्यांच्यावर भर द्यावा. भारत ही विकसनशील अर्थव्यवस्था असल्याने भारतीय बाजार आणि आंतरराष्ट्रीय विकसित बाजार हे मिश्रण योग्य ठरते. थेट शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची इच्छा आणि वेळ असेल तर आघाडीच्या बाजारांना प्राधान्य द्या. अन्यथा, आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये "डायव्हर्सिफाईड फंड' अथवा "ईटीएफ'शी निगडित म्युच्युअल फंड योजना निवडा. 

वरील मुद्दे विचारात घेऊन  आंतरराष्ट्रीय गुंतवणूक अमेरिका केंद्रित फंडपासून सुरु करु शकता. क्षेत्रनिहाय जोखीम टाळण्यासाठी व्यापक "इंडेक्स फंड' निवडा. भारतीय शेअर बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजार यांचे योग्य मिश्रण असणाऱ्या काही योजना जादा टॅक्स फायदा मिळवून देतात. भारतीय बाजाराचे मिश्रण असलेल्या फंडापेक्षा पूर्णपणे आंतरराष्ट्रीय बाजाराशी निगडित फंड निवडा, कारण तुमच्याकडे देशांतर्गत म्युच्युअल फंड आधीच आहेत. "इंटरनॅशनल फंड'मध्ये गुंतवणूक करताना "रिस्क प्रोफाइल'चा आधार घ्या. कारण, "इंटरनॅशनल फंड' प्रत्येक गुंतवणूकदाराच्या प्रोफाइलला साजेसे असतीलच असे नाही. त्यामुळे विचारपूर्वक गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com