सचिन बंसल यांची बोट (boAt)मध्ये 20 कोटींची गुंतवणूक !

वृत्तसंस्था
बुधवार, 17 जुलै 2019

अॅपल, सॅमसंग आणि बोस सारख्या कंपन्यांसमोर दमदारपणे उभी असलेली स्टार्ट-अप

नवी दिल्ली: फ्लिपकार्टचे सहसंस्थापक, सचिन बंसल यांनी एका कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रातील स्टार्ट-अपमध्ये गुंतवणूक केली आहे. बोट (boAt)या स्टार्ट-अपमध्ये बंसल यांनी 20 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. बोट (boAt)ही कंपनी त्यांच्या इअरफोन, स्पीकर आणि ट्रॅव्हल चार्जर यासाठी प्रसिद्ध आहे. बंसल यांच्या गुंतवणूकीचा वापर बोट (boAt) आपल्या व्यावसायिक कामांसाठी करणार आहे. इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रात जिथे अॅपल, सॅमसंग आणि बोस यासारख्या कंपन्यांचा दबदबा आहे तिथे बोट (boAt)ने मागील आर्थिक वर्षात आपल्या उत्पादनांची 100 कोटी रुपयांची विक्री केली आहे. 

आगामी काही वर्षात आपला व्यवसाय 500 कोटी रुपयांवर नेण्याचे बोट (boAt)चे उद्दिष्ट आहे. 2016 मध्ये बोट (boAt)ची स्थापना अमन गुप्ता आणि समीर मेहता यांनी केली होती. बोट (boAt)ची आता दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांमध्ये 45 सदस्यांची टीम आहे. बोट (boAt)च्या ट्रेंडी स्पीकर आणि हेडफोनने बाजारात वेगळाच ठसा उमटवल्याचे, तसेच 12 लाख ग्राहकांना जोडल्याचे कंपनीने सांगितले आहे. बोट (boAt) सरासरी दररोज 8,000 युनिटची विक्री करते. ऑनलाईन तसेच अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या माध्यमातून बोट (boAt)ची उत्पादने उपलब्ध आहेत. त्याचबरोबर क्रोमा आणि विजय सेल्ससारख्या स्टोअरमधूनसुद्धा कंपनीची उत्पादने उपलब्ध आहेत. बोट (boAt)च्या उत्पादनांची निर्मिती भारत आणि चीनमध्ये कंत्राटी स्वरुपात केली जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sachin Bansal's fund invests Rs 20 cr in consumer electronics start-up boAt