‘विस्तारणाऱ्या अर्थव्यवस्थेचे लाभार्थी व्हा’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

भारतातील युवावर्ग, महिला आणि ग्रामीण भागातील नागरिकांची खर्च करण्याची क्षमता वेगाने वाढत असल्याने ग्राहककेंद्री भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी येत्या काळात झपाट्याने सुधारणार असून, या बदलाचे आणि विस्तारणाऱ्या अर्थव्यवस्थेचे लाभ मिळविण्यासाठी म्युच्युअल फंडासारख्या आधुनिक साधनांमध्ये गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मत भांडवली बाजार विश्‍लेषक आणि म्युच्युअल फंड क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ हितेश माळी यांनी पुण्यात नुकतेच व्यक्त केले. 

भारतातील युवावर्ग, महिला आणि ग्रामीण भागातील नागरिकांची खर्च करण्याची क्षमता वेगाने वाढत असल्याने ग्राहककेंद्री भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी येत्या काळात झपाट्याने सुधारणार असून, या बदलाचे आणि विस्तारणाऱ्या अर्थव्यवस्थेचे लाभ मिळविण्यासाठी म्युच्युअल फंडासारख्या आधुनिक साधनांमध्ये गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मत भांडवली बाजार विश्‍लेषक आणि म्युच्युअल फंड क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ हितेश माळी यांनी पुण्यात नुकतेच व्यक्त केले. 

‘सकाळ मनी’ आणि ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड’ यांच्यातर्फे आयोजित ‘पारंपरिक कमी परतावा देणाऱ्या साधनांमध्ये गुंतवणूक विरुद्ध अधिक चांगला परतावा देणाऱ्या आधुनिक साधनांमध्ये गुंतवणूक’ या विषयावरील खास कार्यक्रमात ते बोलत होते. गणेश कला-क्रीडा मंच येथे झालेल्या या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यात महिलावर्गासह तरुण, मध्यमवयीन, ज्येष्ठ नागरिक असे सर्व वयोगटातील नागरिक उपस्थित होते. तुलनेने रुक्ष समजल्या जाणाऱ्या आर्थिक वा गुंतवणूक विषयावरील या कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद लक्षणीय होता. श्री. माळी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या बदलाचे चित्ररूप दर्शन घडवत, ‘आपला देश बदलतोय,’ हे विविध 

उदाहरणांतून उलगडून दाखविले. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण वक्तृत्वशैलीने तमाम श्रोतृवर्गाला त्यांनी सुमारे दीड-दोन तास अक्षरशः खिळवून ठेवले. 

भारतीय अर्थव्यवस्था ही ग्राहककेंद्रित आहे. भारताची १३० कोटी एवढी प्रचंड लोकसंख्या ही देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने जमेची बाजू असून, ‘बचत करणारी अर्थव्यवस्था’ ते ‘खर्च करणारी अर्थव्यवस्था’ म्हणून देशाची ओळख झपाट्याने बदलत आहे. परिणामी, देशातील प्रमुख कंपन्यांच्या नफ्यात आणि भांडवलामध्ये वाढ होत आहे. येत्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर हा दोन अंकी राहील, असा विश्वास देशातील; तसेच जागतिक पातळीवरील अनेक तज्ज्ञांना वाटत आहे. आपल्या अर्थव्यवस्थेविषयी परदेशी लोकांना अधिक विश्‍वास वाटत आहे आणि त्याचमुळे अनेक बड्या परदेशी कंपन्या भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत आहेत. आपल्या अर्थव्यवस्थेच्या भविष्यातील अशा संभाव्य भरभराटीची आपल्यासारख्या सर्वसामान्यांना फक्त जाणीव होऊन उपयोग नाही, तर त्याबद्दल आपल्या मनात दृढ विश्‍वास असायला हवा, असे आग्रही प्रतिपादन करीत श्री. माळी यांनी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचे लाभार्थी होण्यासाठी योग्य पर्यायात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ असून, त्यासाठी म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय असल्याचे नमूद केले. 

पारंपरिक गुंतवणूक साधनांमध्ये मिळणाऱ्या परताव्याचा दर कमी होत आहे. ही बाब लक्षात घेऊन शेअर बाजार किंवा इतर आर्थिक घडामोडींचा अभ्यास नसणाऱ्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड हा चांगला परतावा देणारा गुंतवणूक पर्याय म्हणून समोर आला असल्याचे त्यांनी सांगितले. शेअर बाजारात चढ-उतार होतच राहणार, त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नसते. गुंतवणूक काढून घेण्याची ती वेळ नसते. उलट घसरत्या बाजारातच ‘एसआयपी’ यशस्वी होते, कारण त्या वेळी कमी भावात जास्त युनिट्‌स मिळत जातात. बाजार वधारल्यावर त्याचा फायदा दिसून येतो, असे सांगून माळी यांनी सर्वसामान्यांच्या मनातील गैरसमज दूर करण्याचा प्रभावीपणे प्रयत्न केला. यासाठी त्यांनी दिलेले ‘ईसीजी’चे उदाहरण अतिशय बोलके ठरले.

या वेळी ‘सकाळ मनी’चे संपादक मुकुंद लेले यांनी सर्वसामान्यांनी पारंपरिक गुंतवणूकविषयक मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे सांगत, म्युच्युअल फंडासारख्या गुंतवणूक पर्यायाचा विचार का केला पाहिजे, हे अधोरेखित केले. गुंतवणूक या विषयावर जनजागृती करण्यासाठी ‘सकाळ’ने वेळोवेळी राबविलेल्या उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली. ‘सकाळ मनी’चे व्यवसायप्रमुख रोशन थापा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ‘सकाळ मनी’चे उपसंपादक गौरव मुठे यांनी ‘सकाळ मनी’च्या नव्या वेबसाइटबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय तावडे यांनी केले.

‘ते’ आलिंगन बाजारपेठेला!
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने नोटाबंदी, जीएसटी, रेरा, दिवाळखोरीचा कायदा यांसारख्या गोष्टींच्या माध्यमातून आमूलाग्र बदलांचे पाऊल उचलले असून, ते देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी लाभदायी ठरणारे आहे, असे सांगून श्री. माळी म्हणाले, की २०१९ मध्ये कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी त्यांना या बदलांपासून आता माघार घेता येणार नाही. पंतप्रधान मोदींना परदेशातील बड्या देशांचे प्रमुख नेते नेहमीच प्रेमाने आलिंगन देताना दिसतात. हे आलिंगन एकट्या मोदींना नसून, ते आपल्या देशातील १३० कोटी लोकसंख्येच्या बाजारपेठेला असते, असे सांगताना त्यांनी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या अंगभूत सामर्थ्याची ताकद स्पष्ट केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Money ICICI Prudential Mutual Fund expanding economy