Smart Investment : म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ तयार करण्याची कलाent | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mutual Fund
स्मार्ट गुंतवणूक : म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ तयार करण्याची कला

स्मार्ट गुंतवणूक : म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ तयार करण्याची कला

निवड ही जगातील सर्वांत शक्तिशाली गोष्ट आहे. ज्यांच्याकडे ही आहे ते काहीही करू शकतात. इतिहास पुन्हा लिहू शकतात, इतकेच काय, तर त्यांची आर्थिक वाटचाल देखील बदलू शकतात. म्हणूनच निवड ही शहाणपणाने आणि जबाबदारीने करायची गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही तुमचे आर्थिक नियोजन तयार करीत असता, तेव्हा तुम्हाला सोप्या पायऱ्यांचा अवलंब करणे गरजेचे असते; ज्यातून तुमची वाटचाल आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने सुनिश्चित होईल. यात तुमची अल्प मुदतीची आणि दीर्घ मुदतीची उद्दिष्ट्ये निश्चित करणे, तुमची जोखीम क्षमता पडताळणे, मालमत्तेचे गरजेनुसार वर्गीकरण करणे आणि रणनीती आखून त्यानुसार गुंतवणूक करणे, यांचा समावेश असतो.

सर्वप्रथम तुम्हाला कोणत्या मालमत्तेत गुंतवणूक करायची आहे, त्याची निवड करावी लागते. उदा. तुम्हाला डेट म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची आहे, का इक्विटी म्युच्युअल फंड, हायब्रीड फंड, एक्सचेंज ट्रेडेड फंड किंवा सर्वांच्या मिश्र योजनांमध्ये गुंतवणूक करायची आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची आणि त्याची निवड कशी करायची. यासाठी तुम्हाला योजनांचा अभ्यास करावा लागेल. मागील काही वर्षांतील ‘रिटर्न्स’चा आढावा घेणे, योजनेतील नियम आणि अटी समजून घेणे आवश्यक आहे. तुमची गुंतवणूक आणि ‘रिटर्न्स’ची अपेक्षा या योजनेत गुंतवणूक केल्यास पूर्ण होईल का, याचा आढावा घ्यायला हवा. तसेच योजनेत किती जोखीम आहे याची खात्री करणे आणि तुम्ही किती जोखीम घेऊन गुंतवणूक करू शकता, याचा अंदाज घ्यायला हवा. काळजीपूर्वक केलेला अभ्यास आणि विश्लेषण यामुळे तुम्हाला अशा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे सोपे जाईल, जी योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल. त्याचबरोबर एक गोष्ट तुम्ही विसरता कामा नये आणि ती म्हणजे तुमचा पोर्टफोलिओ हा वैविध्यपूर्ण असला पाहिजे; ज्यात विविध म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक केलेली असेल. यामुळे एक निश्चित होईल, की एका योजनेच्या खराब कामगिरीनंतरही तुमच्या पोर्टफोलिओच्या कामगिरीवर फारसा परिणाम होणार नाही.

या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक म्युच्युअल फंड कंपन्यांनी ॲसेट अॅलोकेशन योजना बाजारात आणल्या आहेत. ‘ऑल सिझन फंड’ म्हणून या फंड योजनांचा गुंतवणूकदार विचार करू शकतात. बाजारातील प्रत्येक अनिश्चित घटना या फंडांसाठी ‘कमी किमतीत खरेदी आणि उच्च किमतीत विक्री’ची संधी घेऊन येते. परिणाम असा होतो, की हे फंड बाजाराचे एक संपूर्ण चक्र पूर्ण करतात आणि जोखीम हाताळून गुंतवणूकदारांना चांगले ‘रिटर्न्स’ देतात. एकरकमी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी या फंडांचा निश्चितच विचार करायला हवा.

उदाहरण द्यायचे झाले, तर या श्रेणीत सातत्यपूर्ण कामगिरी करणारा एक उत्तम फंड म्हणजे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ॲसेट अॅलोकेटर फंड. या फंडाने वेगवेगळ्या कालावधीत सातत्याने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. यात इक्विटीमध्ये किमान गुंतवणूक असूनदेखील दीर्घ मुदतीत या फंडाने इक्विटीप्रमाणे ‘रिटर्न्स’ देण्यास यश मिळविले आहे. अशासारख्या योजनांचा विचार करता येऊ शकेल.(लेखक ‘आप्युलन्स मनी’चे संचालक आहेत.)

Web Title: Sanjay Kotkar Writes About Art Of Building A Mutual Fund Portfolio

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mutual Fundportfolio
go to top