अबब! निव्वळ नफा किती? तर 78 हजार कोटी रुपये

वृत्तसंस्था
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

तब्बल 111 अब्ज डॉलरचा कमावला नफा

मुंबई: सौदी अरेबियाच्या आघाडीची सौदी अरॅमको ही पेट्रोलियम कंपनी 2018 मध्ये जगात सर्वाधिक नफा कमावणारी कंपनी ठरली आहे. सौदी अरॅमकोने अमेरिकेच्या अॅपल आणि एक्झॉन मोबील सारख्या तगड्या कंपन्यांना मागे टाकत 2018 मध्ये जगात सर्वात जास्त नफा कमावला आहे. सौदी अरॅमकोने 111.1 अब्ज डॉलर (जवळपास  78 हजार कोटी रुपये) इतका प्रचंड नफा 2018 मध्ये मिळवला आहे. ही रक्कम भारताच्या अर्थसंकल्पाच्या जवळपास तिप्पट इतकी आहे. रिलायन्सचे बाजारमूल्य साधारणपणे 8 लाख 82 हजार कोटी रुपये तर टीसीएसचे बाजारमूल्य जवळपास 8 लाख कोटी रुपये इतके आहे. यावरून सौदी अरॅमकोच्या 111 अब्ज डॉलर नफ्याच्या अवाढव्य रकमेचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. 

सौदी अरामकोचा 2018 साठीचा एकूण महसूल तब्बल 224 अब्ज डॉलर इतका आहे. अॅपलचा महसूल 82 अब्ज डॉलर तर एक्झॉन मोबीलचा महसूल 40 अब्ज डॉलर इतका आहे. क्रेडीट रेटिंग कंपन्यांनी सौदी अरॅमकोला ए प्लस मूल्यांकन दिलेले आहे. या कंपनीचा आयपीओ 2018 मध्ये अपेक्षित होता मात्र काही कारणास्तव हा आयपीओ 2021 पर्यत पुढे ढकलण्यात आला आहे. नजीकच्या काळात कंपनीचा मोठा विस्तार करण्याचेही अरॅमकोचे नियोजन आहे. सौदी अरॅमकोच्या उत्पन्नावर सौदी अरेबियाची राजसत्ता मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. अरॅमकोकडून येणाऱ्या भांडवलातूनच सौदी अरेबियाच्या नागरी आणि लष्करी उद्दिष्टांवर खर्च केला जातो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saudi Aramco remains world’s most profitable company