स्मार्ट खबरदारी : क्रिप्टो करन्सीचे मायाजाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bitcoin
स्मार्ट खबरदारी : क्रिप्टो करन्सीचे मायाजाल

स्मार्ट खबरदारी : क्रिप्टो करन्सीचे मायाजाल

आपल्या सरकारचा क्रिप्टो करन्सीला पाठिंबा नसला तरी क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणूक गेल्या काही काळात झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येते. याबाबतची सद्यःस्थिती, गुंतवणुकीचा पर्याय व यातील जोखीम समजून घेणे गरजेचे आहे.

रिझर्व्ह बँकेने २०१८ मध्ये आपल्या नियंत्रणाखालील सर्व संस्थांना क्रिप्टो करन्सी किंवा त्याला आवश्यक असणाऱ्या सेवा-सुविधा न देण्याबाबत परिपत्रक काढून सूचना दिल्या होत्या. मात्र, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ झाल्याने चार मार्च २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयाने हे परिपत्रक रद्दबातल ठरविले. परिणामी, क्रिप्टो करन्सी व यातील गुंतवणूक याबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा होऊ लागली व गेल्या काही दिवसांत यातील गुंतवणुकीत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी केंद्र सरकारने क्रिप्टो करन्सीला अद्याप मान्यता दिलेली नाही. मात्र, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा वापर करून ‘डिजिटल इकॉनॉमी’ला चालना देण्याचे धोरण सरकारने नुकतेच जाहीर केले आहे. आजही केंद्र सरकार व रिझर्व्ह बँक यांच्यात याबाबत पूर्णपणे धोरणात्मक सहमती आहे, असे दिसत नाही.

क्रिप्टो करन्सीला अधिकृत मान्यता नसतानासुद्धा यात वाढत असलेली गुंतवणूक पाहून रिझर्व्ह बँक चिंतित आहे, तर क्रिप्टो करन्सीवर कडक निर्बंध आणून यातील व्यवहाराला मान्यता द्यावी, अशी सरकारची धारणा दिसत आहे; जेणेकरून ‘डिजिटल इकॉनॉमी’ला चालना मिळेल व यातून सध्या होणाऱ्या ‘मनी लाँड्रिग’ला व ‘टेरर फंडिंग’ला अटकाव होऊ शकेल. यासाठी फेब्रुवारी २०२१ मध्ये केंद्र सरकारने केंद्रीय मंत्रीगटाची समिती स्थापन केली असून, ही समिती लवकरच याबाबतच्या मार्गदर्शक सूचना देणार असल्याचे समजते. त्यानुसार येत्या एक-दोन महिन्यांत रिझर्व्ह बँक ‘सरकारमान्य डिजिटल करन्सी’ कार्यानवीत करण्याची शक्यता आहे.

सरकारमान्य डिजिटल करन्सी नजीकच्या भविष्यात उपलब्ध झाली, तरी अन्य क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक सुरूच राहणार आहे. त्यामुळे सरकारमान्य डिजिटल करन्सीला नेमका कसा व किती प्रतिसाद मिळेल, हे आज सांगता येणार नाही. मात्र, ज्याप्रमाणे सरकारमान्य युपीआय पेमेंट सुविधेला अल्पावधीत खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला, असाच प्रतिसाद सरकारमान्य डिजिटल करन्सीला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आता आपण क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणुकीचे फायदे व यातील संभाव्य धोके काय आहेत, हे पाहू.

 • जर आपण बिटकॉईन किंवा इथरम यासारख्या क्रिप्टो करन्सीत दीर्घकालीन उद्देशाने गुंतवणूक केली तर चांगला परतावा मिळू शकतो व असा परतावा ज्यांनी याआधी गुंतवणूक केली आहे, त्यांना मिळाल्याचे दिसून येते.

 • क्रिप्टो करन्सीवर कोणाचेच नियंत्रण नसल्याने कोणी मध्यस्थ (एखादी बँक/ रिझर्व्ह बँक/ सरकार) नसल्याने आपल्या गुंतवणुकीवर आपलेच नियंत्रण असते.

 • संपूर्ण जगभरात कोठेही क्रिप्टो करन्सी वापरता येते. थोडक्यात, सर्व ठिकाणी मूल्य एकच असते, देशानुसार बदलत नाही.

 • बँकेत खाते नसले तरी व्यवहार करता येतात.

 • क्रिप्टो करन्सीमधील ‘ट्रेडिंग’ला वेळेचे कोणतेच बंधन नसते. २४ तास यात व्यवहार करता येतात.

 • आंतरराष्ट्रीय पातळीवर सहजगत्या व्यवहार करता येतात.

 • होणारे व्यवहार अत्यंत अल्प कालावधीत व कमी खर्चात होतात. यामुळे वेळेची व पैशांची बचत होते.

 • होणारे व्यवहार बेनामी नसले तरी प्रत्यक्ष व्यवहार करणाऱ्यांव्यतिरिक्त इतरांना याची माहिती मिळत नाही. कारण व्यवहार टोपण नावाने होत असतात व ते ब्लॉकचेन ॲड्रेस वापरूनच होत असतात. यामुळे व्यवहार सुरक्षित असतात.

संभाव्य धोके कोणते?

 • रिझर्व्ह बँक अथवा सरकार या दोन्हींचेही यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणुकीची सुरक्षितता किंवा परतावा (रिटर्न्स) याबाबत कोणीही जबाबदार घेत नाही.

 • होणारे सर्व व्यवहार अनियंत्रित व डिजिटल असल्याने ‘हॅकिंग’ची शक्यता नाकारता येत नाही.

 • ही संकल्पना नवी असून, या टेक्नॉलॉजीचे आवश्यक ते ज्ञान गुंतवणूकदारास असेलच, असे नाही.

 • यातील चढ-उतार (व्होलॅटॅलिटी) खूप मोठ्या प्रमाणावर असल्याने गुंतवणुकीत जोखीम जास्त असते.

 • क्रिप्टो करन्सीला अद्याप सरकारमान्यता नसल्याने कायदेशीर अडचण येऊ शकते. यातील अफरातफरीबाबत तक्रार करता येत नाही.

सध्या जगात बिटकॉईनसारख्या अनेक क्रिप्टो करन्सी अस्तित्वात आहेत. तथापि, क्रिप्टो करन्सी म्हणजे फक्त बिटकॉईन असाच बहुतेकांचा समज आहे. क्रिप्टो करन्सी हा जरी एक गुंतवणुकीचा आकर्षक पर्याय दिसत असला तरी यातील जोखीम समजून घेणे आवश्यक आहे.

(लेखक क्रिप्टो करन्सीतील गुंतवणुकीचे जाणकार आहेत.)

loading image
go to top