‘एसबीआय’कडून गृहकर्ज दरात कपात

वृत्तसंस्था
बुधवार, 10 एप्रिल 2019

रिझर्व्ह बॅंकेच्या रेपोदर कपातीला प्रतिसाद देत देशातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या भारतीय स्टेट बॅंकेने (एसबीआय) गृहकर्जाच्या दरात ०.१० टक्‍क्‍याची कपात केली आहे.

मुंबई - रिझर्व्ह बॅंकेच्या रेपोदर कपातीला प्रतिसाद देत देशातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या भारतीय स्टेट बॅंकेने (एसबीआय) गृहकर्जाच्या दरात ०.१० टक्‍क्‍याची कपात केली आहे. ३० लाखांपर्यंतच्या गृहकर्जाचा दर ८.६० टक्के ते ८.९० टक्‍क्‍यांच्या दरम्यान राहील, असे बॅंकेने म्हटले आहे. यापूर्वी तो ८.७० टक्के ते ८.९० टक्‍क्‍यांच्या दरम्यान होता. याशिवाय सर्व कालावधीतील कर्जांसाठीच्या ‘एमसीएलआर‘मध्ये ०.०५ टक्‍क्‍याची कपात केली आहे. बुधवारपासून (ता. १०) नवे व्याजदर लागू होतील, असे बॅंकेने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. यामुळे कर्जदारांना दिलासा मिळणार आहे.

‘एसबीआय‘ने एक वर्षासाठीचा ‘एमसीएलआर‘ ८.५५ टक्‍क्‍यांवरून ८.५० टक्के केला आहे. त्याशिवाय सर्व कालावधीतील कर्जांसाठीचा एमसीएलआर ०.०५ टक्‍क्‍याने कमी केल्याचे बॅंकेने म्हटले आहे. सलग दोन पतधोरणांमध्ये रिझर्व्ह बॅंकेने रेपोदर कमी केला आहे. पतधोरणातील व्याजदर कपातीचा फायदा ग्राहकांना मिळावा यासाठी रिझर्व्ह बॅंकेने बॅंकांना आवाहन केले आहे. मात्र फेब्रुवारीपासून बॅंका ‘एमसीएलआर‘मध्ये किरकोळ कपात करण्याला प्राधान्य देत आहे. परिणामी, बाजारातील कर्जाचा दर तुलनेने जास्तच असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. पतधोरण शिथिल झाल्यामुळे व्याजदर कपातीचा फायदा ग्राहकांना देण्याबाबत बॅंकांवरील दबाव वाढला आहे. यापूर्वी सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक ऑफ महाराष्ट्रने व्याजदर कमी करून पतधोरणातील रेपो कपातीला प्रतिसाद दिला होता. आज ‘एसबीआय‘ने व्याजदर (एमसीएलआर) कमी करण्याचा निर्णय घेतला. फेब्रुवारीपासून एचडीएफसी, बॅंक ऑफ बडोदा, पीएनबी आदी बॅंकांनी एक वर्षांपासून तीन वर्षांपर्यंतच्या ‘एमसीएलआर‘ दरात कपात केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SBI cuts home loan rates