खुशखबर: "एसबीआय"कडून कर्जदरात कपात

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 November 2019

सार्वजनिक क्षेत्रातील देशातील आघाडीची बँक असलेल्या स्टेट बँकेने कर्जदरात (मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेट) 0.05 टक्‍क्‍याची कपात केली

मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील देशातील आघाडीची बँक असलेल्या स्टेट बँकेने कर्जदरात (मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेट) 0.05 टक्‍क्‍याची कपात केली. यामुळे कर्जदारांना दिलासा मिळाला आहे. या कपातीनंतर बॅंकेचा सर्व मुदतीच्या कर्जांवरील "एमसीएलआर" 8 टक्के झाला आहे. यापूर्वी तो  8.05 टक्के होता. नवे व्याजदर रविवार (ता.10) पासून लागू होतील, असे बॅंकेने म्हटले आहे. चालू वर्षात "एसबीआयने"सातव्यांदा "एमसीएलआर"मध्ये कपात केली आहे.
नव्या कर्जदारांना 8 टक्‍के "एमसीएलआर"ने कर्ज मिळणार आहे. ऑक्‍टोबरपासून बॅंकेने बाह्य मानकावर (एक्‍स्टर्नल बेंचमार्क) आधारित कर्जदर निश्‍चितीचे धोरण लागू केले आहे. यासाठी रिझर्व्ह बॅंकेचा रेपो दर एक्‍स्टर्नल बेंचमार्क म्हणून ग्राह्य धरण्यात आला आहे.  सध्या रेपो दर 5.15 टक्के आहे. त्यावर एसबीआयकडून 2.60 टक्के अतिरिक्‍त भार आकारला जातो. गृहकर्जात आणखी प्रिमियम आकारला जातो, त्यामुळे "एसबीआय"चा "एमसीएलआर" 8 टक्के आहे.

ठेवीदारांना झटका
"एसबीआय"ने "एमसीएलआर"मध्ये कपात करून कर्जदारांना दिलासा दिला असला तरी ठेवीदारांना मात्र ठेवीदरात कपात करून झटका दिला आहे. बॅंकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात देखील कपात केली आहे. एक ते दोन वर्षापर्यंतच्या किरकोळ मुदत ठेवीवरील व्याजदरात 0.15 टक्के आणि बड्या रकमेच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात 0.30 ते  0.75 टक्के कपात करण्यात आली असून नवे व्याजदर रविवारपासून (ता.10) लागू होतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SBI cuts MCLR by 5 bps across all tenors