'एसबीआय'मध्ये पैसे भरणे महागणार !

वृत्तसंस्था
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय स्टेट बॅंकेच्या ग्राहकांना खात्यात पैसे जमा करताना सेवा शुल्काचा भुर्दंड सहन करावा लागण्याची शक्‍यता आहे. "एसबीआय'चे सुधारित सेवा शुल्क येत्या 1 ऑक्‍टोबरपासून लागू होणार आहे.

महिन्यात चौथ्यांदा पैसे जमा केल्यास 56 रुपये सेवा शुल्क
मुंबई - सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय स्टेट बॅंकेच्या ग्राहकांना खात्यात पैसे जमा करताना सेवा शुल्काचा भुर्दंड सहन करावा लागण्याची शक्‍यता आहे. "एसबीआय'चे सुधारित सेवा शुल्क येत्या 1 ऑक्‍टोबरपासून लागू होणार आहे.

एका महिन्यात ग्राहकांना खात्यात अतिरिक्त शुल्काशिवाय तीन वेळा रक्कम जमा करता येईल. मात्र त्यानंतर रक्कम जमा करताना प्रत्येक वेळी 56 रुपये सेवा शुल्क बॅंकेकडून आकारले जाईल, त्यामुळे चौथ्यांदा पैसे जमा करताना ग्राहकांना विचार करावा लागणार आहे. बॅंकेने खात्यातील किमान शिल्लक, धनादेश, एटीएम सेवा आदी सेवांसंदर्भातील नवे शुल्कपत्रक नुकतेच जाहीर केले. मेट्रो आणि अर्बन भागातील शाखांमध्ये किमान तीन हजारांची सरासरी शिल्लक ग्राहकांना ठेवता येईल. बॅंकेने "एटीएम' सेवा शुल्कात सुधारणा केली आहे.

'चेक बाऊन्स'प्रकरणी दंडात्मक शुल्कात वाढ
काही कारणास्तव चेक परत आल्यास त्यावर "जीएसटी'सह 168 रुपयांचा दंड चेक इश्‍यू करणाऱ्याला भरावा लागेल, असे बॅंकेने म्हटले आहे. याशिवाय बचत खातेधारकाला दरवर्षी 10 धनादेश नि:शुल्क दिले जातील. अतिरिक्त 10 चेकसाठी 40 रुपये अधिक जीएसटी आणि 25 चेकसाठी 75 रुपये अधिक जीएसटी असे शुल्क ग्राहकाला द्यावे लागणार आहे. ज्येष्ठ नागरिक आणि पगारदारांना धनादेश नि:शुल्क असतील, असे बॅंकेने म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SBI Money Deposit expensive