स्टेट बॅंकेच्या कर्जदरात कपात 

वृत्तसंस्था
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने देखील कर्जाच्या दरात 15 बेसिस पॉईंट्स अर्थात 0.15 टक्क्याची कपात केली

 नवी दिल्ली ः रिझर्व्ह बँकेने आज रेपो दरात 0.35 टक्क्याची कपात केली आहे.  त्यानंतर त्याचा फायदा सामान्यांपर्यंत पोचवण्याचे आवाहन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी केले होते. त्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने देखील कर्जाच्या दरात 15 बेसिस पॉईंट्स अर्थात 0.15 टक्क्याची कपात केली आहे.  एसबीआयने एमसीएलआरच्या दरात  0.15 टक्क्यांची कपात केली होती. बँकेचा एका वर्षासाठीचा एमसीएलआर दर 8.40 टक्क्यांवरून कमी करत 8.25 टक्के करण्यात आला आहे. चालू वर्षात 10 एप्रिलपासून आतापर्यंत बँकेने गृह कर्जाच्या दरात 0.35 टक्क्याची कपात केली आहे. 

 सुधारित व्याजदर 10 ऑगस्टपासून  लागू करण्यात येणार आहे. यामुळे नवीन गृहकर्ज आणि वाहन कर्ज काहीसे स्वस्त होईल. शिवाय मासिक हप्ता कमी होणार असून बॅंकांमधील लाखो कर्जदारांना दिलासा मिळणार आहे. पतधोरणानंतर लगेच "एसबीआय'ने व्याजदर कमी केल्याने इतर बॅंकांकडून व्याजदर आढावा घेऊन "एसबीआय'चे अनुकरण केले जाण्याची शक्‍यता आहे.  दरम्यान व्याजदरांमधील बदलांचा फायदा मिळवण्यासाठी कर्जदारांनी एमसीएलआर व्याजदरांचा पर्याय स्वीकारण्याचे आवाहन गेल्या काही महिन्यांपासून एसबीआयकडून करण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SBI to reduce MCLR by 15 bps