ऑटोमोबाईलचा ‘टॉप गिअर’, सहाशे चारचाकी तर अडीच हजार दुचाकींची होणार डिलिव्हरी

प्रकाश बनकर
Thursday, 12 November 2020

जसजशी दिवाळी जवळ येत आहे, तसतसा बाजारपेठेत खरेदीचा उत्‍साह वाढत आहे. कोरोनामुळे यंदा ऑटोमोबाईल क्षेत्रावर परिणाम जाणवेल, असे सांगण्यात येत होते. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाची दिवाळी ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी टॉपची राहणार आहे.

औरंगाबाद : जसजशी दिवाळी जवळ येत आहे, तसतसा बाजारपेठेत खरेदीचा उत्‍साह वाढत आहे. कोरोनामुळे यंदा ऑटोमोबाईल क्षेत्रावर परिणाम जाणवेल, असे सांगण्यात येत होते. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाची दिवाळी ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी टॉपची राहणार आहे. येत्या चार दिवसात जिल्‍ह्यात सहाशे चारचाकी आणि अडीच हजार दुचाकींची विक्री होणार आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात दोनशे कोटीहून अधिकची उलाढाल होणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

कोरोनामुळे सहा महिन्याहून अधिक काळ बाजारपेठ बंद होत्या. उद्योगही अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरु झाले नाहीत. यामुळे नामांकित कंपन्यांच्या चारचाकींना वेटिंग आहे. चारचाकी वाहनांची मागणी मोठी आहे. मागणी असलेल्या वाहनांची आठ ते पंधरा दिवसांची वेटिंग असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. विजया दशमीच्या पार्श्‍वभूमीवर दिडशे कोटींची उलाढाल झाली होती. त्यावेळी साडेपाचशे चारचाकी, दोन हजार दुचाकींची विक्री झाली होती.

त्याप्रमाणात दिवाळी जोरदार राहणार आहेत. आतापर्यंत ग्राहकांनी चारचाकी आणि दुचाकींची बुकिंग केली. नियमीतपणे शहर व जिल्ह्यात तीन ते पाच चारचाकी आणि दहा ते २० दुचाकी, २ ते तीन तीन चाकी वाहनींची विक्री होत आहे. वेटिंग नसती तर ८०० ते एक हजार चारचाकीची विक्री झाली असती, असे वाहन विक्रेते विकास वाळवेकर यांनी सांगितले. ऑटोमोबाईल कंपन्या आणि बँकातर्फे वेगवेगळ्या ऑफर्स असल्यामुळे ग्राहकांना सहजरित्या कर्ज आणि सवलतींचा लाभ घेता येत आहे. यामुळे विक्री वाढली आहे, असेही वाळवेकर यांनी सांगितले.
 

Edited - Ganesh Pitekar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Selling Boom Of Vehicles In Aurangabad