शेअर निर्देशांकाची  आगेकूच कायम

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 3 एप्रिल 2019

मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स १८५ अंशांची झेप घेत ३९ हजार ५६ अंशांच्या विक्रमी पातळीवर बंद झाला. 

मुंबई -  गुंतवणूकदारांच्या चौफेर खरेदीने सलग चौथ्या सत्रात शेअर निर्देशांकांची आगेकूच कायम राहिली. मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स १८५ अंशांची झेप घेत ३९ हजार ५६ अंशांच्या विक्रमी पातळीवर बंद झाला. 

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ४४ अंशांची वाढ झाली आणि तो ११ हजार ७१३.२० अंशांवर स्थिरावला. रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीची बैठक सुरू झाली आहे. विकासाला पूरक भूमिका घेत रिझर्व्ह बॅंक या वेळीही व्याजदर कमी करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे व्याजदराशी संबंधित बांधकाम, टेलिकॉम, आयटी, वाहन आदी क्षेत्रांत खरेदीचा जोर दिसून आला. गेल्या काही महिन्यांपासून घसरणाऱ्या टाटा मोटर्सच्या समभागांना आज खरेदीदारांनी प्रतिसाद दिला. गेल्या दोन सत्रांत टाटा मोटर्सचे समभाग ८ टक्‍क्‍यांनी वधारले. त्याशिवाय भारती एअरटेल, टीसीएस, बजाज फायनान्स, पॉवरग्रीड, इंड्‌सइंड बॅंक, एसबीआयचे समभाग तेजीसह बंद झाले. 

सेन्सेक्‍सने ४० वर्षे पूर्ण केली, ही मुंबई शेअर बाजारासाठी अभिमानाची बाब आहे. सेन्सेक्‍स हा भारतीय भांडवली बाजाराचा एक मापदंड आहे. गेल्या ४० वर्षांत सेन्सेक्‍सने दरवर्षी सरासरी १७ टक्के परतावा दिला आहे. 
- आशीषकुमार चौहान,  मुंबई शेअर बाजाराचे सीईओ
 

Web Title: Sensex up 185 points to close at record high of 39560