तब्बल पाच लाख कोटी पाण्यात

तब्बल पाच लाख कोटी पाण्यात

मुंबई -  पंजाब नॅशनल बॅंकेतील नवा आर्थिक गैरव्यवहार आणि अर्थसंकल्पात औद्योगिक क्षेत्रासाठी भरीव तरतुदीअभावी अपेक्षाभंग झालेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी (ता. ८) विक्रीचा जोरदार सपाटा लावला. आशियातील नकारात्मक संकेतांचे पडसाद देशांतर्गत भांडवली बाजारांमध्ये उमटले. निर्देशांकांनी तीन वर्षांतील मोठी घसरण अनुभवली. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स ७९२.८२ अंशांनी घसरून ३८ हजार ७२०.५७ अंशांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत २५२.५५ अंशांची पडझड झाली आणि तो ११ हजार ५५८.६० वर बंद झाला. सलग दोन सत्रांमधील घसरणीने गुंतवणूकदारांना तब्बल पाच लाख कोटींचे नुकसान झाले. 

आजच्या सत्रात बॅंक, रियल्टी, पॉवर, ऑईल, ऑटो आणि ‘पीएसयू‘ आदी क्षेत्रात विक्रीचा सपाटा दिसून आला. अर्थचक्राला गतिमान करण्याच्यादृष्टीने अर्थसंकल्पात ठोस उपाययोजना घोषित केल्या जातील, अशी अपेक्षा गुंतवणूकदारांनी केली होती, मात्र त्यांची घोर निराशा झाली. शुक्रवारी दुपारच्या सत्रात गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री करत अर्थसंकल्पावर निराशा व्यक्त केली होती. यामुळे निर्देशांक ३९४ अंशांनी आपटला होता. आजच्या सत्रात त्याचाच पुढील अंक दिल्याचे शेअर दलालांनी सांगितले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप श्रेणीत २.४६ टक्‍क्‍यांपर्यंत घसरण झाली. दरम्यान, बाजारात अनिश्‍चिततेचे वातावरण आणखी काही काळ राहण्याची शक्‍यता दलालांनी व्यक्त केली आहे.

अमेरिकेतील रोजगाराची सकारात्मक आकडेवारीमुळे फेडरल रिझर्व्हची व्याजदर कपात लांबणीवर पडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या कारणाने गुंतवणूकदारांनी विक्री करून नफावसुलीचा मार्ग स्वीकारल्याचे दिसून आले. 

दिवसभरात ३.३९ लाख कोटींचा फटका 
सलग दोन सत्रांत सेन्सेक्‍सने १,०८६ अंश गमावले आहेत. या घसरणीनंतर ‘बीएसई‘वरील सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारभांडवल १ कोटी ४७ लाख ९६ हजार ३०२ कोटींपर्यंत कमी झाले आहे. आज दिवसभरात कंपन्यांचे बाजारभांडवल ३ लाख ३९ हजार कोटी रुपयांनी घटले. 

बॅंकांचे शेअर होरपळले
नीरव मोदीने केलेल्या सुमारे १३ हजार कोटींच्या गैरव्यवहारातून सावरत नाही तोच ‘पीएनबी’ने शनिवारी ३ हजार ८०५ कोटींचा आणखी एक गैरव्यवहार झाल्याचे रिझर्व्ह बॅंकेला कळवले. या वृत्तानंतर बाजारात बॅंका आणि वित्त संस्थांच्या शेअर्समध्ये तुफान विक्री दिसून आली. यात ‘पीएनबी’चा शेअर सर्वाधिक १०.९५ टक्के, बजाज फिनसर्व्ह १०.०८ टक्‍के, बॅंक ऑफ इंडिया ९.८६ टक्‍क्‍यांनी घसरले. त्याखालोखाल एचडीएफसी, एसबीआय, ॲक्‍सिस बॅंक, बॅंक ऑफ बडोदा आदी शेअर घसरणीसह बंद झाले. 

कशामुळे झाली पडझड
  अर्थसंकल्पातून गुंतवणूकदारांची निराशा
  परकी गुंतवणूकदारांवर (एफपीआय) कर वाढीचा बोजा 
  पंजाब नॅशनल बॅंकेकडून आणखी एक गैरव्यवहार झाल्याचे जाहीर 
  मॉन्सून कमी झाल्याने खरिपावर परिणाम होण्याची शक्‍यता
  फेडरल रिझर्व्ह व्याजदर कपात लांबणीवर पडण्याची शक्‍यता
  आशिया आणि युरोपातील भांडवली बाजारात घसरण

रुपयात २४ पैशांचे अवमूल्यन 
चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयात २४ पैशांचे अवमूल्यन झाले. तो ६८.६६ वर बंद झाला.


जगभरातील  निर्देशांकात पडझड 
निर्देशांक     घसरण (टक्‍क्‍यांमध्ये) 
शांघाय    २.५८
हॅंगसेंग    १.५४
निक्केई    ०.९८ 
कोस्पी    २.२०
सेन्सेक्‍स    २.०१
निफ्टी    २.१४
‘एसअँडपी ५००’      ०.५२ 
नॅसडॅक    १.०७
डाउजोन्स    ०.३८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com