निर्देशांकातील पडझड कायम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मे 2019

तिमाही निकालांतून निराशा
आयसीआयसीआय बॅंक आणि भारती एअरटेल या बड्या कॉर्पोरेट्‌सनी चौथ्या तिमाहीत निराशाजनक कामगिरी केल्यामुळे गुंतवणूकदारांचा भ्रमनिरास झाला. आयसीआयसीआय बॅंकेच्या शेअरची जोरदार विक्री झाली. बॅंकेचा शेअर ४ टक्‍क्‍यांनी घसरला. बॅंकेला जानेवारी ते मार्च या तिमाहीत १ हजार १७० कोटींचा नफा झाला. नफ्यात केवळ २.४५ टक्‍क्‍यांची वृद्धी झाली. एअरटेलच्या शेअरमध्ये तीन टक्के घसरण झाली.

मुंबई - अमेरिका-चीनमधील व्यापारी संघर्ष चिघळल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच कॉर्पोरेट कंपन्यांच्या निराशाजनक तिमाही निकालांचा बाजारावर परिणाम दिसून आला. गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा कायम ठेवल्याने मंगळवारी सेन्सेक्‍समध्ये ३२३.७१ अंशांची घट झाली आणि तो ३८ हजार २७६.६३ अंशांवर बंद झाला. निफ्टीत १००.३५ अंशांची घट झाली आणि तो ११ हजार ४९७.९० वर बंद झाला. दिवसभरात सेन्सेक्‍सने ६०० अंशांची डुबकी घेत गुंतवणूकदारांची गाळण उडवली होती. 

सलग पाचव्या सत्रात निर्देशांकाची घसरगुंडी झाल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.आज सकाळपासून बाजारात विक्रीचा मारा सुरू होता. यात टेलिकॉम, एनर्जी, बॅंकेक्‍स, मेटल, रियल्टी आदी क्षेत्रांतील महत्त्वाचे शेअर घसरले. टाटा मोटर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, डीएचएफएल, टाटा पॉवर, डिश टीव्ही, बॉम्बे डाइंग, जेट एअरवेज, सेल, रिलायन्स इन्फ्रा, बॅंक ऑफ बडोदा, कॅनरा बॅंक आदी शेअरमध्ये घसरण झाली. एचयूएल, एल अँड टी, पॉवर ग्रीड, इन्फोसिस, ओएनजीसी, बजाज ऑटो शेअर तेजीसह बंद झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex Decrease Investment