निर्देशांकातील पडझड कायम

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 24 एप्रिल 2019

रुपया सावरला
चलन बाजारात रुपयाने आज दमदार कामगिरी केली. कच्च्या तेलाच्या महागाईचे पडसाद उमटल्याने सोमवारी रुपयात मोठे अवमूल्यन झाले होते. आज भांडवली बाजारात घसरण सुरू असताना रुपया मात्र डॉलरसमोर स्थिर राहिला. दिवसअखेर तो पाच पैशांनी वधारून ६९.६२ बंद झाला. बॅंकांनी डॉलरची विक्री केल्याने रुपयाला फायदा झाला.

मुंबई - कच्च्या तेलाच्या भाववाढीची धास्ती घेतलेल्या गुंतवणूकदारांनी मंगळवारी (ता. २३) विक्रीचा सपाटा कायम ठेवला. आजच्या सत्रात वित्त संस्था आणि ऑटो क्षेत्रातील समभागांमध्ये तुफान विक्री झाली. ज्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ८०.३० अंशांनी घसरून ३८ हजार ५६४.८८ अंशांवर बंद झाला. तत्पूर्वी निर्देशांकाने ३०० अंशांची झेप घेतली होती; मात्र अनिश्‍चिततेच्या पार्श्‍वभूमीवर विक्रीचा मारा सुरू झाला आणि निर्देशांकात घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही १८.५० अंशांची घसरण झाली आणि तो ११ हजार ५७५.९५ अंशांवर बंद झाला. 

अमेरिकेने इराणवरील निर्बंध कडक केल्यामुळे जगभरातील तेलपुरवठा कमी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका उडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जागतिक गुंतवणूकदार धास्तावले आहेत. या घडामोडींचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे भांडवली बाजारातील दबाव कायम आहे.

आजच्या सत्रात ‘मारुती’च्या समभागांमध्ये ३.६० टक्‍क्‍यांची घट झाली. त्याशिवाय येस बॅंक, इंड्‌सइंड बॅंक, टाटा स्टील, हिरो मोटोकॉर्प, एनटीपीसी आदी समभाग घसरणीसह बंद झाले. दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, आयटीसी, आयसीआयसीआय बॅंक, एचसीएल टेक, एचयूएल आदी समभाग तेजीसह बंद झाले. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, सोमवारी (ता. २२) परकी गुंतवणूकदारांनी ७३.०८ कोटींचे समभाग खरेदी केले. स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मात्र ६८.१६ कोटींच्या समभागांची विक्री केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex Decrease Rupees