बाजारात साडेपाच लाख कोटींचा चुराडा

पीटीआय
गुरुवार, 9 मे 2019

रुपयातही घसरण
व्यापारी संघर्ष व भांडवली बाजारात सुरू असलेल्या विक्रीच्या सपाट्यामुळे चलन बाजारात रुपया सलग तिसऱ्या सत्रात घसरला. बुधवारी डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये २८ पैशांचे अवमूल्यन होत तो ६९.७१ वर बंद झाला. परकी गुंतवणूकदारांनी बुधवारी ७०१ कोटींच्या शेअरची विक्री केली. अमेरिका-चीनसंघर्षामुळे जागतिक व्यापाराबाबत चिंता व्यक्त होत असून, त्याचे पडसादही चलन बाजारात उमटत आहेत.

सेन्सेक्‍सची ४८७ अंशांनी डुबकी; व्यापारी संघर्षाचे पडसाद
मुंबई - अमेरिका व चीनमधील व्यापारी संघर्ष भडकण्याच्या शक्‍यतेने जागतिक पातळीवरील चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. याचे पडसाद बुधवारी पुन्हा शेअर बाजारात उमटले. धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी विक्रीला प्राधान्य दिल्याने मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स तब्बल ४८७ अंशांनी घसरून ३७,७८९ अंशांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत १३८ अंशांची घट होत तो ११,३५९ अंशांवर बंद झाला. तत्पूर्वी गेल्या सहा सत्रांतील पडझडीत सुमारे साडेपाच लाख कोटींचा चुराडा झाल्याचा अंदाज आहे.

व्यापारी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांवरील दबाब कायम आहे. अशात कंपन्यांचे निराशाजनक तिमाही निकाल पाहता अर्थव्यवस्थेची गती मंदावण्याची शक्‍यताही वर्तवली जात आहे. यामुळे हवालदिल झालेल्या गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला असून, आज जवळपास सर्वंच क्षेत्रांत विक्रीचा मारा दिसून आला. सेन्सेक्‍स मंचावर रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर सर्वाधिक ३.३५ टक्‍क्‍यांनी घसरला. त्याबरोबरच बजाज फायनान्स, टाटा मोटर्स, बजाज ऑटो, एसबीआय, वेदांता येस बॅंक, एचडीएफसी आदी शेअर घसरले. एशियन पेंट्‌स, एचसीएल, टीसीएसचे शेअर तेजीसह बंद झाले. 

२३ मे रोजी जाहीर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमुळेही गुंतवणूकदारांमधील धाकधूक वाढल्याचे शेअर बाजारातील दलालांनी सांगितले. दरम्यान, मंगळवारी परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मंगळवारी ६४५.०८ कोटींच्या शेअर्सची विक्री केली, तर स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ८१८.८४ कोटींचे शेअर खरेदी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex Decrease Rupees Rate Less